आंबा पिकतो, रस गळतो… पण कोकणच्या ‘राजा’साठी यंदा आणखी करावी लागणार प्रतीक्षा ! यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता

| Updated on: Dec 08, 2023 | 12:17 PM

यंदा आंबाप्रेमींसाठी चिंतेची बातमी आहे. कारण यंदा फळांचा राजा, हापूस खाण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे. यंदा हापूस आंब्यांचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळ बाजारात फळ येण्यासाठी वेळ लागू शकतो.

आंबा पिकतो, रस गळतो... पण कोकणच्या राजासाठी यंदा आणखी करावी लागणार प्रतीक्षा ! यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता
Image Credit source: TV9 Network
Follow us on

रत्नागिरी | 8 डिसेंबर 2023 : चैत्र महिन्याची सुरूवात होताच सर्वांना गुढी पाडव्याचे आणि त्यापाठोपाठ आंब्याचे वेध लागतात. आंब्यासारखं मधुर, रसाळ फळ आवडतं असेल असा माणूस विरळाच.आणि आंब्याच नाव घेतलं की डोळयासमोर पहिले नाव येतं ते कोकणचा राजा.. हापूस यांचं. कधी एकदा आंब्याची पेटी घरात आणतो आणि देवासमोर नैवेद्य दाखवून आंबा खातो असेच सगळ्यांना होत असतं. पण यंदा मात्र आंबाप्रेमींसाठी चिंतेची बातमी आहे. कारण यंदा फळांचा राजा, हापूस खाण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे.

यंदा हापूस आंब्यांचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. सध्या 15 टक्केच हापूसच्या कलमांना मोहोर आल्याने फळ हातात येण्यासाठी बराच काळ वाट बघावी लागू शकते. कमी कलमांना आलेला मोहोर, तसेच ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस या तिन्ही गोष्टींचा फटका आंब्याच्या पिकाला बसू शकतो. तसेच मोहोर प्रक्रिया लांबल्याने यंदा हापूसचा हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदा 15 ते 20 दिवस हंगाम लांबण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांशी आंब्याच्या झाडांना पालवी फुटली आहे. कलमांना आलेली पालवी जाऊन त्यामधून मोहोर बाहेर येण्यास काही कालावधी जावा लागणार आहे. सध्या पालवी आलेली फांदी जोपर्यंत जूनी होत नाही, तोपर्यंत तिला मोहोर येणार नाही. त्यामुळे यंदाचा हंगाम लांबण्याची शक्‍यता आंबा बागायतदार व्यक्त करत आहे. मोहोर आल्यामुळे हापूस उशिरा येईल. त्यामुळे हापूसला दर मिळणार नसल्याचे अंदाज अनेक जण व्यक्त करत आहेत. आत्ता जो मोहोर आला आहे, त्यातून जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये कैरी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा यायला बराच वेळ लागू शकतो.

अवकाळी पावसामुळे बागायतदार धास्तावले

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी आंब्याच्या झाडावर सध्या मोहर डवरला आहे. पण अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंब्याच्या झाडावर सध्या किडीचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. या किडीने मोहोरावर आणि आंब्याच्या पालवीवर मोठ्या प्रमाणात ॲटॅक केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेही आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

आंबा बागायतदार आता संघर्षाच्या भूमिकेत

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील अंबा बागायतदार आता संघर्षाच्या निर्णायक भूमिकेत आहेत. ११ डिसेंबर पासून जिल्ह्यातील आंबा बागायतदार बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. या उपोषणात जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या सर्व संघटना सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी आंब्याचं कमी उत्पादन आल्यामुळे आका एका कलमाला पंधरा हजार रुपये देण्याची मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे.