मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknanth Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आता नव-नवीन आरोप होत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ताफ्याने अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यातील विमानात बसलेला एक फोटो जोरदार चर्चेत आहे. शिंदेंच्या ताफ्यात इतर आमदार-खासदारांसह सिद्धेश अभंगे या ठाण्यातील शिवसैनिकाचाही समावेश आहे. अभंगे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याने मागील वर्षी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यालाही पवित्र अयोध्येत धुवायला नेला होता का, असा सवाल आता शिवसेनेनं केलाय.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विमानातल्या फोटोवरून सणसणीत सवाल केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना उद्देशून त्यांनी लिहिलंय… ‘ काय हा ‘फडतूस’पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का @Dev_Fadnavis
जी? असा सवाल दानवे यांनी केलाय.
काय हा ‘फडतूस’पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का @Dev_Fadnavis जी? https://t.co/5KjNDs3aET
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 10, 2023
ठाण्यातील कुख्यात गुंड अशी सिद्धू अभंगे याची ओळख आहे. मागील वर्ष मे महिन्यात, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वी अभंगे याने शिवसेनेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी डॉन असल्याच्या आविर्भावात सिद्धेश अभंगेचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाले होते. युट्यूब भाई असं त्याला संबोधलं जात होतं. खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकावणे, धारदार हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. तरीही वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत अभंगेचा युवासेनेत प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात अभंगे दिसून आल्याने ठाकरे गटाने यावरून जोरदार टीका केली आहे.