ठाणे: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यात तीव्र उष्णतेची लाट (Heat wave in Maharashtra) येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात तर येलो आणि ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात (thane) उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवेतली आर्द्रताही कमी झाल्यानं कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतोय. आज दुपारी अंबरनाथ शहरात 42 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. याचवेळी विदर्भात मात्र 38 ते 39 अंशांवर पारा होता. त्यामुळे तापमानात अंबरनाथ (ambernath) शहरानं विदर्भालाही मागे टाकल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथमध्ये दुपारच्या या उन्हात नागरिकांना अक्षरशः चटके बसू लागल्यानं नागरिकांनी शितपेयांच्या गाड्यांवर गर्दी केल्याचंही दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच तापमानाचा पारा वाढताना पहायला मिळतोय. आज आणि उद्या दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. हवामान खात्याचा हा अंदाज खरा होताना पहायला मिळतोय. कारण कालपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान वाढतंय. काल राज्यातील सर्वात जास्त म्हणजे 39 अंशाहून अधिक तापमान रत्नागिरीत नोंदवलं गेलं. आज सकाळपासून हा तापमानाचा पारा वाढतोय. लोकांच्या अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळतेय.
नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचला आहे. अजूनही तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वाढत्या उष्णतेपासून संरक्षणाच्या सर्व उपाययोजना करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहत असल्याने दुपारीच रस्ते ओस पडू लागले आहेत. तर नागरिक दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळत आहेत. तापमान अधिक वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या उन्हाळी पिकांची काळजी घ्यावी तसेच या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच फळधारणा करणाऱ्या बागांमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. आज सकाळी 9 वाजताच औरंगाबाद शहराचे तापमान 29 अंश सेल्सिअसवर पोहोचले होतेय. दुपारी दोन वाजेपर्यंत तापमान 38 अंश सेल्सिअसवर गेले होते. सकाळी 9 वाजल्यापासूनच जाणवतोय शहरात उन्हाचा कडाका जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले होते.
नागपूरसह विदर्भातही तापमान वाढलंय. विदर्भात अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद येथे झाली आहे. अकोल्यात 39 तर इतर शहरांमध्ये सुद्धा पारा 37 अंशाच्या पुढं गेलाय. दिवसा उष्ण वारे वाहू लागले आहेत. त्यामुळं घरोघरी कुलर सुरू झालंय. दिवसा घराबाहेर पडणं कठीण झाल्याने कामानिमित्त घराबाहेर पडताना नागरिक विशेष काळजी घेताना दिसत आहेत. विदर्भात पुढील दिवसांमध्ये तापमान वाढणार असून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
संबंधित बातम्या:
शक्ती कायद्यावर अखेर राष्ट्रपतींची सही, दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेत माहिती; काय आहे शक्ती कायदा?
Maharashtra News Live Update : वांद्रेच्या स्टेलर वर्ल्ड स्कूल शाळेत आयटीचे छापे