विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा

| Updated on: Nov 28, 2024 | 8:32 AM

Amit Shah and Vinod Tawde Meeting : महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याची चर्चा होत आहे. अशातच विनोद तावडे आणि अमित शाह यांची बैठक झाली आहे.

विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा
अमित शाह, विनोद तावडे
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याबाबत राजधानी दिल्लीत खलबतं सुरु आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याची चर्चा होत आहे. निकाल लागून पाच दिवस झालेत मात्र अद्यापपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.

विनोद तावडे आणि अमित शाह यांची बैठक

विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात ‘महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा’ या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अन् त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलननाने घेतलेलं व्यापक स्वरूप यामुळे यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा समाजाच्या मतांचा कल अत्यंत महत्वाचा ठरला. अशातच आता सत्तास्थापनेच्या घडमोडींमध्ये देखील मराठा समाजाला दुखावलं जाऊ नये, असा सूर दिसतो आहे. विनोद तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीतही याच मुद्यावर चर्चा झाली.

महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक

महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदी कोण?, प्रश्न कायम

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप जो मुख्यमंत्री करेन, त्याला पाठिंबा असेल, असं म्हटलं. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री असेल. हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जरी दिल्लीतून हिरवा कंदील असला तरी त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण? हा अद्याप प्रश्नच आहे.