चंदन पूजाधिकारी, नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असतांना त्यांचे पुत्र तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले आहे. अमित ठाकरे यांनी यांनी नाशिक बद्दल विशेष प्रेम असल्याचे अनेकदा बोलून दाखविले आहे. नाशिकला येण्याची मी नेहमी संधी शोधत असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखविले आहे. अमित ठाकरे हे दौऱ्यावर येण्यापूर्वी नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांमधील काही पदाधिकारी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामध्ये मनसेचा सचिन भोसले यांनी मनसेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून पक्ष सोडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने अमित ठाकरे याबाबत चाचपणी करण्यासाठी आले होते का? याबाबतची दबक्या आवाजात मनसेच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. या अगोदरच राज ठाकरे यांनी नाशिकच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते. त्यामुळे नाशिकच्या मनसे पदाधिकारी यांच्या आलबेल नसल्याचे चित्र थेट राज ठाकरे यांच्या पर्यन्त गेल्याने अमित ठाकरे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
यामध्ये अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या नव्या नियुक्त्या नव्या वर्षात केल्या जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे, जानेवारीमध्ये पुन्हा दौऱ्यावर येणार असल्याचे देखील अमित ठाकरे यांनी सांगितले आहे.
माध्यमांशी बोलत असतांना अमित ठाकरे म्हणाले विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी आलो आहे, तसं ही नाशिकला यायला आवडत, मी नाशिकला येण्यासाठी कारणंच शोधत असतो.
सगळ्या पदाधिकार्यना मुंबईत बोलवण्या ऐवजी मीच नाशिकला आलो, नाशिकमध्ये उत्साह असतोच, मी मागच्या दौऱ्यात सगळीकडे फिरलो, सगळ्यांना विद्यार्थी सेनेते काम करण्याची इच्छा आहे.
निवडणूक लागणार कधी ते मला सांगा, मग आपण त्या बद्दल बोलू, मी एप्रिल ऐकतोय, सप्टेंबर ऐकतोय, तुम्हाला कळाल की मला सांगा मग आपण त्यावर बोलू म्हणत अमित ठाकरे यांनी निवडणुकीवर बोलणं टाळलं आहे.
आता निवडणुकीची तयारी वगैरे नाही, तर पक्ष बांधणीसाठी हा दौरा आहे. पक्षात येत जात असतात लोक, आमच्याकडे भाजपाच्या 150 जणांनी मुंबईत प्रवेश केलाय, राजकारणात हे होत असतं.
लोक जात असले तरी आमच्याकडे रिप्लेसमेंट रेडी आहे, साहेबांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की एखादं दोन गेले तर काही फरक पडत नाही, एक एक माणसाला ओढून त्यांना काय मिळतंय मला माहित नाही,
जानेवारीत मी परत येणार आहे, नाशिकची टीम तयार झाली आहे, कॉलेज लेव्हलला युनीट स्थापन करायचे आहेत, त्याच्या तयारीला लागणार आहे. मनसेची पहिली फेज नक्की परत येणार असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.