मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे तरूण नेते अमित ठाकरे यांची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. राजकारणातील नवा, तरूण, आश्वासक चेहरा अशी ख्याती असलेले अमित ठाकरे यंदा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी राजकारण, राज ठाकरे यांच्याशी असलेलं नातं, या क्षेत्रातील प्रवास अशा अनेक विषयांवर दिलखुलास उत्तरं दिली.
कुणी दिली सिनेमाची ऑफर ?
यावेळी त्यांना पिक्चरमध्ये काम करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. एका पिक्चरमध्ये तुम्ही दिसणार आहात, असं बातम्यांमध्ये ऐकायला आलं होतं, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. महेश मांजरेकर हे एकदा साहेबांना ( राज ठाकरे) बोलले होते, हे खरं आहे. तेव्हा मांजरेकर सरांनी म्युझिक ऐकवलं होतं. तेव्हा मी राजकारणात नव्हतो. माझ हे पॅशन आहे, मला कॅमेऱ्याच्या पुढे किंवा मागे काम करायचं आहे. मांजरेकर सर आले होते तेव्हा त्यांनी मला विचारलं होत एफ यु मध्ये काम करणार का? तेव्हा आईला विचारलं, तर ती म्हणाली बाबाला विचार, बाबाने स्टेजवर उत्तर दिलं, अशी आठवण अमित ठाकरे यांनी सांगितली.
यावेळी अमित ठाकरे यांना इतर विषयांवरही अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याचीही त्यांनी मनमोकळेपणे उत्तरं दिली.
जर तुम्ही मुख्यमंत्री झालात किंवा नाही झालात तर तीन इच्छा काय ? ज्या राजकारणात बदलाव्यात ?
इच्छा खूप आहेत. लोक घरी यायचे, मी त्यांना ऑबजर्व्ह करायचो, शाळेत जाताना अनेक गोष्टी ऑबजर्व्ह करायचो. ती म्हणजे लोकांना समाधान होत की मी या राज्यात राहतो. पण आता लोकांच्या चेहऱ्यावर ते हावभाव नाहीत, त्यांची ती स्माइल, हास्य लोप पावलं आहे, ते हास्य परत आणायचं आहे. तुम्ही ज्या शहरात, राज्यात राहता त्याबद्दल बरं वाटलं पाहिजे. तुम्हाला काही देत नसू तर ती आमची (राजकारणी) चूक आहे. लोकांची स्माईल परत आली पाहिजे, असं ते म्हणाले.
विचारांचा वारसा की कौटुंबिक वारसा महत्वाचा आहे ?
विचारांचा वारसा महत्वाचा, जे आहे ते आहे. माझा बाबा बाळासाहेबांना ऑबजर्व्ह करत आला, तसं मी बाबांना करतोय. कसा बोलतात, काय करतात ? स्टेजवर कसा बोलतात ? अनेक गोष्टी त्यांच्याकडून पीकअप करतो. माझ्या काही गोष्टी चुकत असतील, मी स्वभावात चुकेन, पण विचारात चुकणार नाही. शेवटी माणूस आहे थोडं चुकू शकतो.
महाराष्ट्रातील युवकांना काय हवंय आता?
बेसिक गरजा आहेत. ग्रामीण भागात बघितलं तर त्याना शाळेत जाता येत नाही कारण मध्ये नदी आहे. शहरांत प्ले पार्क नाहीत, चांगल्या सुविधा नाहीत, देशाचा आणि जनसंख्या हा राज्याचा मूळ मुद्दा आहे. मुंबईच्या संख्येपेक्षा कॅनडाची संख्या कमी आहे. आपण कुठं चाललोय हे लक्षात घेतलं पाहिजे.
ट्रोलिंग वाढलं आहे. राजकारणात ट्रोलिंग आर्मी वाढलेलं आहे, तुम्ही यांना महत्व देता का ?
नाही, मी आता इंस्टाग्रामवर आलोय तेही बायकोच्या सांगण्याने. मी तर पोस्ट टाकल्यानंतर पण विसरून जातो. पण शेवटी पैसे दिल्यानंतर जी लोक लिहतात ते वेगळं. पण ज्यांच्या घरी भांडण होतात ते राग व्यक्त करणारी लोक वेगळी. टीकेकडे लक्ष द्यायचं नाही. त्यांना टीका करू द्या.