नाशिक : आगामी काळात कधीही महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) वतिनेही याबाबत रणनीती ठरवली जात आहे. अशातच मनसेचे युवा नेते यांचे गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिकचे दौरे वाढले आहे. त्यामध्ये अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांच्यावरच नाशिकची जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे. नाशिक महानगर पालिकेवर पुन्हा मनसेचा झेंडा फडकविण्यासाठी अमित ठाकरे हे रणनीती ठरवत आहे. युवा कार्यकर्त्यांची मोट बांधत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर आले आहे. दोन दिवसीय दौऱ्यात अमित ठाकरे हे नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. याशिवाय प्रभागानुयार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे.
नाशिक महानगर पालिकेत कधीकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती. त्यानंतर नाशिकमध्ये सत्ता गेल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिककडे अमित ठाकरे यांनाच जास्त लक्ष देण्यासाठी सांगितल्याची चर्चा आहे.
अमित ठाकरे हे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये असलेल्या पक्षातील पदाधिकारी यांच्यात बदल करण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्यात बदल करण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
कधीकधी नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड होता. महापालिकेत सत्ता, तीन आमदार अशी ताकद मनसेची होती. मात्र नंतरच्या काळात स्थानिक नेत्यांमध्ये असलेला विसंवाद आणि पक्षाला नंतर आलेले अपयश पाहता अनेकांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ नाशिककडे मनसेने अधिक लक्ष दिले आहे. आता प्रभागानुसार पक्षाची स्थिती काय आहे ? यासाठी अमित ठाकरे स्वतः आढावा घेणार आहे. त्यामुळे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे काम यावरून दिसणार आहे. त्यामुळे हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
नाशिक महानगर पालिकेत मनसेचे बळ पाहता पक्षाला उभारी देण्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र पक्षात असलेली गटबाजी हा मुद्दा यावेळी चर्चिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेबरोबरच प्रमुख पदाधिकारी यांच्याबाबत माहिती राज ठाकरे यांना देण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी मागील बैठकीतच नाशिक शहराच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या कामावरून नाराजी व्यक्त केल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे यांचा दौरा महत्वाचा मानला जात असून त्यामध्ये काही सुधारणा झाली आहे की नाही याची चाचपणी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.