तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे?, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. अमोल कोल्हे हे राजीनामा द्यायला निघाले होते. त्यांना मीच थांबवलं होतं, असा दावाही अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे. ज्याला नटसम्राट म्हणवता, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला..! मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटीसम्राट, खोकेसम्राट असलेलं चांगलं, असा खडा सवाल अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
अमोल कोल्हे गावभेट दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील काळूस गावात आले होते. यावेळी त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला. अजित पवार फार मोठे नेते आहेत. मी फक्त एवढचं म्हणेल, मी जे काही केलं ते स्वकर्तृत्वाने केलं. माझे काका नटसम्राट नव्हते. अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा. मग त्यांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
महायुतीत धुसफूस
यावेळी अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या जागा वाटपावरही चिमटा काढला. महायुतीला अजूनही उमेदवार आयात करावे लागतात. उत्तर भारतात हीच परिस्थिती आहे. काही उमेदवार तर भाजपचे तिकीट परत करत आहेत. महायुती अजूनही बॅकफूटवर आहे. महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.
मेरे पास…
मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है… तुम्हारे पास क्या है… हा जुना संवाद. आताच्या काळात असं म्हणतात, मेरे पास नेता है, मेरे पास पैसा है, सत्ता है, तुम्हारे पास क्या है? तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मेरे पास शिरुर मतदारसंघातली मायबाप जनता आहे, असंही ते म्हणाले.
राजकारणातील स्तर घसरू नये
प्रचारात जेष्ठ नागरिकांकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका होत असताना कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हातातला माईक काढून घेतल्याचा प्रकार इंद्रायणीनगर भोसरीमध्ये घडला. दिलीप वळसे पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या राजकारणाच्या रिंगणात ओढणं चुकीचं असल्याचं सांगत राजकारणातील सुसंस्कृतता प्रत्येकाने जपली पाहिजे हीच यामागील भावना होती, असं कोल्हे म्हणाले. निवडणूक येते, जाते, पद येतात, जातात पण राजकारणाचा स्तर घसरू नये ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.