अमरावती | 6 नोव्हेंबर 2023 : अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. यापैकी 1 ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती. मात्र उर्वरीत 19 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यात अपक्ष सदस्यांनी बाजी मारली आहे. तर, प्रस्थापित पक्षांना जनतेने नाकारले असे हा निकाल सांगत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर खासदार झाल्या. तर, आमदार रवी राणा हे ही अपक्ष आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे अमरावतीचा निकाल पहाता या राणा दाम्पत्य यांचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले.
अमरावती जिल्हा ग्रामपंचायत निकाल लागला आहे. यात जनतेने पक्ष सोडून जाणारे आणि मूळ पक्षात असणारे अशा दोन्ही जणांना नाकारले आहे. या निवडणुकीत शिंदे गट, ठाकरे गट, अजितदादा गट आणि शरद पवार गट यांना जनतेने नाकारले आहे. या चारही पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. मात्र, कॉंग्रेस आणि भाजपने आपली लाज राखली आहे.
ग्रामपंचायतीच्या निकालात जनतेने 20 पैकी 10 ग्रामपंचायती अपक्षांच्या ताब्यात दिल्या आहेत. तर, कॉंग्रस आणि भाजपला प्रत्येकी चार ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत आपले खाते खोलले आहे. त्यांना 1 ग्रामपंचायती मिळाली आहे. तर, आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेलाही 1 ग्रामपंचायती मिळाली आहे.
शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यापैकी ठाकरे गट आणि शिंदे गटाला जनतेने नाकारले आहे. 20 पैकी एकही ग्रामपंचायत या दोन्ही गटाकडे आली नाही. त्याचप्रमाणे शरद पवार गट आणि अजितदादा गट यांनाही एकही ग्रामपंचायती ताब्यात घेता आली नाही.
निवडणुकीपूर्वी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटले होते. या चारही नेत्यांमध्ये शाब्दिक चमकी झडल्या. एकमेकांचे शाब्दिक वस्त्रहरण केले गेले. मात्र, मतदारांनी या निवडणुकीत सर्वाचे उट्टे काढले असेच या निकालावरून दिसून येत आहे.