अमरावती : अमरावतीतील कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपी लॅब कर्मचाऱ्याला अटक करुन बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. (Amravati lab technician arrested)
संबंधित तरुणी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे या तरुणीची कोरोना चाचणी करणे आवश्यक होतं. त्यामुळेच ती चाचणीसाठी लॅबमध्ये गेली असता, तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा आरोपीला अटक केली. अल्पेश अशोक देशमुख (30, रा. पुसदा, जि. अमरावती), असे आरोपीचे नाव असून तो बडनेऱ्याच्या लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहतो.
संबंधित 24 वर्षीय तरुणी अमरावती इथे भावाकडे राहत असून, एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, संपर्कातील 20 जणांचे स्वॅब 28 जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी अल्पेश देशमुखने संबंधित मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले.
यानंतर त्या तरुणीने ही बाब वरिष्ठ महिला सहकाऱ्यास सांगितली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असे म्हटले.
त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. गुप्तांगाद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने, तिने त्याबाबत भावाला सांगितले. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्हा दाखल केले आहेत.
(Amravati lab technician arrested)
संबंधित बातम्या
पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर अत्याचार, पीडितेची पुन्हा एकदा कोरोना चाचणी
माझा सर्जा-राजा उपाशी, बैलजोडीची काळजी, कोव्हिड सेंटरमधून शेतकऱ्याचं पलायन