स्वप्निल उमप, अमरावती : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संयुक्त सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र निशाणा साधला. देशाचे पंतप्रधान जनतेला त्यांची डिग्री का दाखवत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या टीकेवरून आता उद्धव ठाकरे यांना भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून टार्गेट केलं जातंय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही हनुमान चालिसा आणि हिंदुत्वारून उद्धव ठाकरे यांना डिवचलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असं संबोधलं पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.
उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरून नवनीत राणा यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, ‘ उद्धव ठाकरेंचं नाव आता बदललेल आहे भाईजान उद्धव ठाकरे नाव झालेल आहे. 33 महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही.संभाजीनगरातील दंगलीच्या बातम्या पाहून वेदना झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले, त्यावरूनही राणा यांनी सुनावलं. 33 महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला. तेव्हा का वेदना झाल्या नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही, असंही नवनीत राणा यांनी सुनावलं. ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकारं चालवली ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, असं राणा यांनी ठणकावून सांगितलं.
येत्या हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून सामुहिक हनुमान चालिसा पठनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मागील हनुमान जयंतीची आठवण नवनीत राणा यांनी सांगितली. हनुमान चालीसा वाचायचं म्हटल्यावर डोक्यात विचार येते, की बाबा पुन्हा आतमध्ये तर टाकणार तर नाही ना.. मागील वर्षी हनुमान चालीसा नाव घेतल्यानंतर 33 महिन्याच्या सरकारने मला जेलमध्ये टाकलं होतं…
संभाजीनगरातील दंगल राष्ट्रवादी काँग्रेसचं कटकारस्थान होतं, अशी टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केली. यावरून अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली होती. ज्यांनी अमरावतीत दंगल भडकवण्याचं काम केलं, ती व्यक्ती किती विषारी असेल, अशी टीका मिटकरी यांनी केली. तसेच हे नेते आणखी किती काळ भाजपची चमचेगिरी करणार, असा सवालही केला. यावर नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, जे लोक लोकांमधून निवडून आले नाही ,त्यांना लोकांची भावना कळत नाही. लोकांसाठी मेहनत केले नाही अशा लोकांवर मी काय बोलणार. मी संघर्ष करून इथपर्यंत पोहचली आहे. त्या लोकांवर बोलण्यात मला इंटरेस्ट नाही…