अमरावती : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, अशी टीका भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. मुंडावना बांधून नवरदेव सजला आहे. घोड्यावरही बसले आहेत. आता यूपीएचे घटक या नवरदेवाला स्वीकारतील का..?, असा सवाल अनिल बोंडे यांनी उपस्थित केला. यूपीएच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते अनिल बोंडेंची शरद पवारांवर ही टीका केली. यूपीएच्या कोणत्याच घटकांनी शरद पवार यांना आमंत्रण दिले नाही. प्रस्तावही दिला नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) पोरांना हाताशी धरलं. स्वतःच्या उपस्थितीत त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि टाळ्याही वाजवल्या, असंही अनिल बोंडे म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, नाना पटोले हे शरद पवारांना स्वीकारणार का, असा प्रश्न अनिल बोंडे यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जी, प्रशांत किशोर यांच्या मार्फत फिल्डिंग लावून काहीही करून मला नवरदेव करा, असंच काहीस शरद पवारांच म्हणणंय. काहीही करून 80 व्या वर्षात मला नवरदेव करा, अशीच काहीशी परिस्थिती शरद पवार यांची झाली आहे.
कोणी काही म्हणो वा न म्हणो, मान न मान मैं तेरा मेहमान या म्हणी प्रमाणे शरद पवारांनी स्वतःची आरती ओवाळून घेतली आहे. शरद पवारांनी खूप प्रयोग करून पाहिले. गोव्यात ते नोटाच्या पलीकडे पोहचू शकले नाहीत. ममता बॅनर्जी, मुलायमसिंगसह इतर नेत्यांसोबत शरद पवार कशी मोट बांधतात हे पाहावे लागणार आहे. काँग्रेसशिवाय मोट बांधतील का हेही पाहावे लागेल, असा खरपूस समाचार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांचा घेतला.