अमरावती : शिक्षण (Education) हे महत्त्वाचे असून केवळ विजेच्या कारणामुळे त्यात अडचणी येऊ नयेत. त्याकरिता जिल्हा विकास निधीतून ५ % निधी खर्च करून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालविण्यात येणार आहेत. ही महत्वपूर्ण घोषणा आज अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली. तसेच त्यांनी राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या राजकारणावर ही टीका केली. भोंग्यावर त्या म्हणाल्या, भोंगे आणि आदी गोष्टींतून सतत नकारात्मक पसरवली जात आहे, या गोष्टींना आपण वेळीच आळा घालू शकतो. त्या डॉ. पंजाबराव देशमुख बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, अमरावती यांच्यावतीने आयोजीत शिक्षक विद्यार्थी संवाद कार्यक्रम बोलत होत्या. या कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृह, पंचवटी पार पडला. यावेळी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रंजीतसिंह डिसलेंसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कोविड काळानंतर खास करून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक वेगळया प्रकारची भीती व भावना तयार झाली आहे. त्यावर चर्चा करून चांगल्या विचारांचे आदानप्रदान करून मार्ग काढावा लागेल. कोणत्याच गोष्टीमुळे शिक्षण थांबवून चालणार नाही. विजेचा पर्याय म्हणून यापूर्वी सर्व अंगणवाड्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात आला आहे. यापुढे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी जिल्ह्यात विकास निधीतून ५ % निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.
शिक्षण फार महत्त्वाचे आहे. शिक्षणाने आपल्याला विचार मिळतो. चांगल्या विचारांनी आपण एक ध्येयाची उंची गाठू शकतो. आपल्या प्रत्येकाला सांविधनाने विचार स्वातंत्र्य दिले आहे. संविधानाने जो समानतेचा अधिकार दिला आहे त्याची जाणीव ठेवल्यास आपल्याला कुणीही धर्मा-धर्मा, जाती-जातीत लढवू शकत नाही. भोंगे आणि आदी गोष्टींतून सतत नकारात्मक पसरवली जात आहे, या गोष्टींना आपण वेळीच आळा घालू शकतो, असेही त्यांनी सूचित केले.