अमरावती: प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काल अपघात झाला. त्यामुळे त्यांना अमरावतीहून नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. त्यामुळे बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला आहे. मात्र, बच्चू कडू यांच्या या अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडून हा घातपात करण्याचा प्रयत्न होता का? असा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी व्यक्त केली होती. विस्तार करता येत नसेल तर करू नका. पण खोटं बोलू नका, असं बच्चू कडू म्हणाले होते. काल त्यांचाही अपघात झाला. हा अपघात झाला की याच लोकांनी घडवून आणला? याची चौकशी करण्याची मागणी मी केली आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.
हा अपघात होता की सत्ताधाऱ्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न होता का? याची चौकशी झाली पाहिजे. जर असं राजकारण हे करत असतील महाराष्ट्रातील जनता 2024 ला या सरकारला सत्तेवरून खेचल्याशिवाय राहणार नाही. लोक वाट पाहून आहेत. लोकशाहीला पायदळी तुडवणारे हे लोक आहेत, अशी टीका मिटकरी यांनी केली.
यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. सोमय्या यांनी तीन नावे त्यांनी सांगितली. ते ब्रह्मज्ञानी आहेत का? भावना गवळींच्या विरोधात तुम्ही असंच रान पेटवलं होतं. त्या शिंदे गटात गेल्या आणि शांत झाला. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी दोन कोटीचं घड्याळ मातोश्रीला दिल्याचं हेच किरीट सोमय्या कागदपत्रे घेऊन सांगत होते. तेही धुतल्या गेले का?, असा सवाल त्यांनी केला.
हसन मुश्रीफ जेरीस येत नव्हते म्हणून गणपती विसर्जनाच्या दिवशी मुश्रीफ यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण ते बधले नाहीत. रेड मारणे हा मानसिक त्रास आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. बदनामी करण्याची सुपारी सोमय्या यांना घेतली आहे. किरीट सोमय्यांच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी मी केली होती.
पण आमच्या सरकारने मोठ्या मानाने त्यांना माफ केलं. त्याचवेळी संभाजी महाराजांसारखी महाविकास आघाडीने कणखर भूमिका घेतली असती तर भीमा कोरेगावची दंगल घडवणारे आणि सोमय्या तुरुंगात गेले असते, असा दावाही त्यांनी केला.