अमरावती : अमरावतीच्या (Amravati) तळेगाव दशासरमधील महिलांच्या शंकर पटात म्हणजेच बैलगाडा शर्यतीत 23 वर्षीय शेतकरी कन्न्या उन्नती लोया (Unnati Loya) हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तिचं कौतुक होत आहे. तिने अवघ्या 13 सेकंदात शर्यतीचं अंतर कापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्या या कामगिरीवर शर्यत पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केलं. अनेकांनी तिला प्रत्यक्ष भेटून तिचं कौतुक केलं.
प्रथम क्रमांक पटकवणारी उन्नती लोया ही युपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे. तिने अवघ्या 13 सेंकद 12 पॉईंटमध्ये बैलजोडीसह शर्यतीचं ठराविक अंतर कापलंय. महिलांच्या या बैलगाडा शर्यतीत जवळपास 15 शेतकरी महिलांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत अखेर उन्नतीने बाजी मारली आहे.
“बैलगाडा शर्यतीत सहभागी होताना खूप छान भावना होत्या. शर्यतीत सहभागी होताना खूप गर्वाच्या भावना होत्या. आठ वर्षांनी हा पट आलेला आहे. मी तर पहिल्यांदाच करत आहे. जेव्हा बघितलं तेव्हा खूप लहान होती”, अशी प्रतिक्रिया उन्नती लोया हिने दिली.
“आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. हा शेतकऱ्यांसाठी खूप चांगला संदेश आहे. सर्वांनी हे करायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठीच हा पट असतो. इथे खूप महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी असतात”, असं उन्नती हिने सांगितलं.
“आमच्या सगळ्यांसाठी हा खूप मानाचा सण असतो. महिलांनी कोणत्याच गोष्टी कमतरता दाखवला नको”, असं उन्नती लोया म्हणाली.