नवनीत राणा या कालपर्यंत अमरावती जिल्ह्याच्या सून होत्या. आता म्हणतात मी मेळघाटची बेटी झाल्या आहेत… पाच वर्षांत कसं नात बदलू शकतात? जात प्रमाणपत्र तर खोटं आहेच आणि नातं ही खोटं सांगतात… अमरावती मधील ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.त्यात जनशक्तीचा विजय होईल. खासदार नवनीत राणा 3 लाख मतांनी विजयी नाही तर पराभूत होतील. आता विजय सत्याचा होईल. अमरावतीत परिवर्तन होईल, असं म्हणत महाविकास आघाडीचे अमरावतीचे उमदवार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीची काय ताकद आहे. हे आज विरोधकांना दाखवून देऊ. कोणाला उमेदवारी द्यावी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे कोणाचेही आव्हान माझ्या समोर नाही. पाच वर्षे राणांची केवळ अरेरावी सुरु होती. त्यांनी नौटंकी केली. या निवडणुकीत एकतफरी माझा विजय होणार आहे. विकासाचे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पुर्ण झाले नाहीत. त्यामुळे लोकांना आता परिवर्तन हवं आहे. त्यामुळे लोक महाविकास आघाडीला मतदान करतील. विजय माझाच असेल, असं वानखेडे म्हणालेत.
अमरावती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बळवंत वानखडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राहणार उपस्थित आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढली जाणार आहे. आज अमरावतीत महाविकास आघाडी अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
नवनीत राणा यांच्या विरोधात महायुतीतीलच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार बच्चू कडू यांच्याकडून अमरावतीमध्ये उमेदवार देण्यात आलाय. अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांचा आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बूब प्रहार पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. माझ्यासोबत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते राहतील. काही प्रमाणात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते देखील माझ्यासाठी काम करतील, असा दावा दिनेश बूब यांनी केला आहे.