शरद पवार यांनी विदर्भावर अन्याय केला. अमरावतीवर अन्याय केला. यासाठी त्यांनी माफी मागावी. नवनीत राणा यांना पाठिंबा दिला, म्हणून माफी मागण्यापेक्षा पवार साहेबांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. विदर्भाला काहीच दिलं नाही, यासाठी शरद पवारसाहेब यांनी माफी मागावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. अमरावतीत बोलताना शरद पवार यांनी एक खंत बोलून दाखवली होती. 2019 ला नवनीत राणा यांना पाठिंबा दिला, त्यामुळे मी दिलगीर आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
अमरावतीत आज महायुतीची सभा होत आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज ही सभा होतेय. अमित शाह या सभेला उपस्थित आहेत. या सभेला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. अमरावतीचा मी भाचा आहे… माझा मामा, माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे जेवढं प्रेम नागपूरवर आहे. तेवढंच अमरावतीवर आहे. नरेंद्र मोदीजी यांची सभा सोडली तर सायन्सस्कोर मैदानावरची सर्वात मोठी सभा आजची आहे. एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे. फैसला तुम्हाला करायचा आहे, असं फडणवीस म्हणाले.
मनसेसह अनेक पक्ष आपल्यासोबत आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांची खिचडी आहे. त्याच्या आघाडीतील नेते म्हणतात राहुल गांधी अपरिपक्व आहेत. देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरेजी होणार असं संजय राऊत यांनी जाहिर केलंय. ज्यांचा एकही खासदार निवडून येऊ शकत नाही ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
नवनीत राणा त्या वाघीणीचं नाव आहे. जिला उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी जेलमध्ये पाठवलं. पण त्या घाबरल्या नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आचारसंहिता संपल्यावर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे येणार आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीच्या जनतेला त्यांनी आश्वस्त केलं आहे.