देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होतेय. भाजपला हरवण्यासाठी देशभरातील नेत्यांनी आघाडी केली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी राज्यात थेट लढत होत आहे. अशात महायुतीतील नेत्यानं खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने एकनाथ शिंदेसाहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे ते पाहिलं गेलं पाहिजे, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे. भावना गवळी की संजय राठोड? कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, ते पाहल्या गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे. मी फक्त अमरावती पुरताच बोलेल. एक खासदार शेतकऱ्यांसाठी, मजुरांच्या प्रश्नासाठी, संत्र्याच्या प्रश्नासाठी ही उमेदवारी आहे. शेतकरी, मजूर , व्यापारी यांचं दुकान बंद करण्याची व्यवस्था येत्या पाच वर्षात सरकारने केली आहे. किराणा, कापड उद्योग बंद झालेले दिसेल. ती अवस्था आमच्यावर येऊ नये. म्हणून दिनेश बुब यांना तिथे पाठवायचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिनेश बुब आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. स्वतः बच्चू कडू राहणार उपस्थित आहे. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली. आज उमेदवारी अर्ज भरताना रॅली काढणार आहोत. आजच्या रॅलीने हे सिद्ध करून दाखवले जाणार आहे की ही निवडणूक नाही तर जन आंदोलन आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
काही नेते लाचार झालेले आहे. पण आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. अमरावती लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये कोणाची लाट नाही. एक नकार मात्र नक्की आहे. नवनीत राणा नको, अशी लोकांची भावना आहे. भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तरी तुम्ही सांगेल की ज्यांनी आमचं कार्यालय फोडलं. भाजपच्या कार्यकत्याला रक्त भांबाळ केलं, पालकमंत्र्यांना ‘बालकमंत्री’ म्हटलं. त्यामुळे हे भाजपचे लोकही फक्त त्यांच्यासोबतआहेत. पण आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत आणि आमचा उमेदवार जिंकणार देखील आहे, असं बच्चू कडू म्हणाले.