अमरावती | 29 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले. ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली. आता अखेर भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संभाजी भिडे हे काल अमरावतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. महात्मा गांधी यांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवलेत. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.
संभाजी भिडे यांच्या विरोधात अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. संभाजी भिडे यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसच आंदोलन सुरू आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील इथं करण्यात येत आहे. गांधीजींचा फोटो घेऊन काँग्रेस आंदोलन करत आहे.
संभाजी भिडेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे संभाजी भिडेंच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. पुण्यात हे आंदोलन केलं जात आहे.
संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाहीत त्यामुळे त्यांना भाजपशी जोडणं योग्य नाही, असं बोंडे म्हणालेत.
काँग्रेसने भिडे यांच्या भाषणाची व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना द्यावी. मी भिडे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली आहे.
महात्मा गांधींचे सर्वच विचार सर्वांना पटतात असं नाही. हिंदूना उद्देशुन महात्मा गांधीनी काही म्हटलं होत त्याचं समर्थन मी करणार नाही. महात्मा गांधींचे सगळेचं विचार पटतात असं नाही, असं अनिल बोंडे म्हणालेत.