अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांना मुख्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय. दिव्यांग राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड करण्यात आली. तसंच या समितीचे ते प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. त्यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत.
मी बच्चू कडू यांना दिव्यांग महामंडळ मिळालं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद मानतो. आमच्या सहकाऱ्यांना एक चांगलं महामंडळ महामंडळ दिलं, असं रवी राणा म्हणाले आहेत.
खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती मतदारसंघावर बच्चू कडू यांनी दावा सांगितला आहे. प्रहार अमरावती मतदारसंघातून लढणार आहे. या मतदारसंघावर आमचं लक्ष आहे.तिथं काम करतोय. इथून आम्ही लढणार आहोत. भाजप-शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा नाही मिळाली तर ठीक. नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यालाही रवी राणा यांनी उत्तर दिलं आहे.
दावा अनेक जण ठोकतात पण याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यांच्यासोबत आम्ही ताकदीने उभे आहोत. ते देखील आमच्यासोबत आहेत, असं रवी राणा म्हणालेत.
माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि दावा करणारे नवनीत राणांचा प्रचार करतील यात काही शंका नाही. वेळेनुसार अनेक बदल आपल्याला दिसतील. पण कुणीही हवेत कुठेही चर्चा नाही केली पाहिजे, असंही रवी राणा म्हणालेत.
कधीही माणसाने दिवसा स्वप्न पाहिली नाही पाहिजेत. ही स्वप्न रात्री पाहायला पाहिजेत. जे दिवसा स्वप्न पाहत आहे. त्यांना लक्षात येईल की स्वप्न ही रात्री पाहिल पाहिजे. मी जे बोलत आहे ती काळा दगडावरची पांढरी रेघ आहे. नवनीत राणाच निवडणूक लढतील. त्यांना सगळ्यांचा पाठिंबा मिळेल, असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.