अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या वलगाव येथे आज धक्कादायक घटना घडली. पोलीस उपनिरीक्षकानं (Sub-Inspector of Police) गळफास घेतला. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीवन संपविल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षकाच्या वडिलांना केलाय. विजय अडोकर (Vijay Adokar) असं गळफास घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अडोकर यांच्या वडिलांनी केली आहे. अडोकर यांना पॅरालिसीसचा आजार होता. बदलीसाठी त्यांनी वारंवार अर्ज दिले होते. पण, त्यांच्या अर्जाला वरिष्ठांना केराची टोपली दाखविली होती. त्यामुळं दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा अडोकर यांच्या कुटुंबीयांनी घेतला. वलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक (Inspector of Valgaon Police Station) यांनी तुम्हाला निलंबित का करू नये, अशी नोटीस दिल्याचा कुटुंबीयांनी आरोप केलाय.
पोलीस उपनिरीक्षक विजय अडोकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. या आजाराने ते त्रस्त झाले होते. त्यामुळं त्यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. पण, त्यांना बदली मिळाली नाही. उलट वरिष्ठ जाच करत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांना केलाय. औषधोपचार सुरू असल्याच्या फाईल्सच त्यांनी टीव्ही 9 च्या बातमीदाराकडं दाखविल्या.
विजय अडोकर यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण पत्नी विधवा झाली. बापाला मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या घटनेनं अडोकर कुटुंबीय हादरून गेले. आता घरचा तरुण पोरगा निघून गेल्यानं कुणासाठी जगायचं असा प्रश्न ते विचारत आहेत. वरिष्ठांनी आजारी कर्मचाऱ्याला सहानुभूती देण्याएवजी छळ केला. या छळातूनच त्यांनी हे घातक पाऊल उचललं असं अडोकर यांच्या वडिलांचं म्हणण आहे. त्यामुळं संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.