अमरावती : अमरावतीच्या अचलपूर (Achalpur) आणि परतवाडामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. आज होणाऱ्या निषेध मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असून पोलिसांकडून (Amravati Police) खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणामुळे (Umesh Kolhe Murder Case) अमरावती चर्चेत आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर परतवाडा शहरात आज पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण आणि जयपूर येथील कन्हैयालाल यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ शक्ती फाउंडेशनच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी शहरातील काही भागात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे. यामध्ये शहरातील ज्येष्ठ चौक, दुरानी चौक, पेन्शनपुरा महावीर चौक, संभाजी चौक लालपुर या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास सध्या एआयएकडे देण्यात आला आहे. एनआयएच्या पथकानं नुकता या प्रकरणातील संशयित आरोपींनी घेऊन क्राईम सीन रिक्रिएट केला होता. 21 जूनला उमेश कोल्हे यांनी गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. कथित नुपूर शर्मा प्रकरणी समर्थनात पोस्ट केल्यानं त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, हत्याप्रकरणाचे दोन सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आले होते. त्यानुसार पोलिसांकडून तपास करण्यात आला होता. उमेश कोल्हे यांचा गळा ज्या पद्धतीने कापण्यात आला, ती पद्धत अतिरेकी संघटनेप्रमाणे असल्याचं आढळून आलं होतं. दोन जुलै उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्रालयानं याबाबतची माहिती दिली होती. उमेश कोल्हे यांच्या हत्येआधी त्यांच्याप्रमाणेच गळा चिरुन उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांचीही हत्या करण्यात आली होती.
कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येमागे नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याप्रकरणी समर्थनात पोस्ट केल्याचा एक समान धागा आहे. या दोन्ही हत्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, या अनुशंगाने तपास केला जातो आहे.