राजकारणात केव्हा काय घडेल हे काही सांगता येत नाही. अनपेक्षित घटनांचा क्रम म्हणजेच राजकारण असते, असे म्हणतात. तर असेच एक नाट्यमय वळण अमरावतीच्या राजकारण पाहायला मिळाले. सकाळी सकाळी बुलढाण्यात आनंदराव अडसूळ यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर थोड्याच वेळात काय चक्रे फिरली कुणास ठाऊक, पण त्याचा परिणाम लागलीच दिसून आला. नवनीत राणा आणि रवी राणा हे थेट अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला गेले. त्यावरुन आता दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचे दिसून येत आहे.
सकाळी जहरी टीका
आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. खरंच त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही, माझा प्रश्न आहे.नैतिकता नाही, अक्कल नाही.. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. गेल्यावेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी , काँग्रेस सोबत होत्या. त्यांनी तिथेच थांबायचे होते.त्यांच्यात अडाणीपणा आहे. 17 रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला होता.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन नाराजी
अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन महायुतीतील काही नेते नाराज होते. प्रहारचे बच्चू कडू यांनी या मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. तर अडसूळ पित्रा-पुत्रांनी पण तलवार बाहेर काढली होती. अभिजीत अडसूळ यांनी तर उमेदवारी अर्ज पण खरेदी केला होता. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग खडतर मानल्या जात होता. या भेटीनंतर अभिजीत अडसूळ बंड करण्याची शक्यता आता मावळली आहे.
आता आनंदराव अडसूळ प्रचाराला जाणार का?
आनंदराव आडसूळ यांनी अगोदर बुलडाणा मतदारसंघ नंतर अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचा गड राखला होता. त्यानंतर नवनीत राणा यांची अमरावती मतदारसंघात एंट्री झाली. आता महायुतीत नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर लढत आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या आनंदराव अडसूळ यांनी एकवेळ राजकारण सोडेल पण राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. काही तत्व आहेत माझी, तडजोडी मध्ये काही गोष्टी महायुतीत इच्छेविरुद्ध स्वीकारल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. आता अभिजीत अडसूळ आणि राणा दाम्पत्य यांच्या भेटीनंतर आनंदराव अडसूळ आता तरी राणा यांच्या प्रचाराला जाणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.