भाजप नेत्या नवनीत राणा आणि AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यातील वाद लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिला होता. आता हा वाद पुन्हा उफाळला आहे. ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केवळ मागणी करुन त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्रच धाडले आहे. गुरुवारी 27 जून रोजी त्यांनी हे पत्र पाठवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणा विरुद्ध ओवेसी असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.
शाब्दिक द्वंद गाजले
लोकसभा निवडणुकीत हैदराबादमध्ये भाजपने ओवेसीविरुद्ध माधवी लता यांना मैदानात उतरवले होते. नवनीत राणा त्यांच्या प्रचारासाठी हैदराबाद येथे गेल्या होत्या. त्यावेळी पण राणा यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली होती. हैदराबादला पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी ही निवडणूक असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तर त्यानंतर अमरावती येथील सभेतही त्यांनी ओवेसी बंधूंवर टीकास्त्र सोडले होते.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
“पॅलेस्टाईन हा परदेशात आहे. त्याचा भारतीय नागरीक अथवा भारतीय संविधानाशी कोणताही संबंध नाही. भारतीय संविधानाचे कलम 102 नुसार, जर कोणताही संसद सदस्य दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी आपली निष्ठा वा दृढता दाखवत असेल, त्याचे प्रदर्शन करत असेल तर हे त्याचे कृत्य खासदारकी खारीज करणारे ठरते.”, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले.
असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच जय पॅलेस्टाईनचे नारे दिले. पॅलेस्टाईन विषयीची त्यांची निष्ठा यातून दिसून आली. इतर राष्ट्राविषयीची ही कृती संविधानाचे उल्लंघन करणारी आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. ही कृती देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी घातक ठरु शकते, असे नवनीत राणा यांनी मत व्यक्त केले.
देशाची अखंडता, एकोपा टिकविणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. संसद सद्स्य असतानाही असदुद्दीन ओवेसी यांनी या गोष्टीचे सार्वजनिकरित्या उल्लंघन केले आहे. हा एक प्रकारचा देशद्रोह आहे, अशा निशाणा त्यांनी साधला.
यापूर्वी पण शाब्दिक हल्ला
नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबाद येथे राणा माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ओवेसी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘जर पोलिसांना केवळ 15 सेकंद ड्युटीवरुन हटविले तरी या दोन भावांना माहिती पण होणार नाही की, ते कुठून आले होते आणि कुठे गेले ते.’ असा निशाणा राणा यांनी साधला होता.