अमरावती : राष्ट्रवादी नेते महबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोप प्रकरणात (Rape Case) आता रोज नवे ट्विस्ट येत आहेत. शनिवारी यातील पीडितेने धक्कादायक दावे केले. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि सुरेश धस यांनी मेहबूब शेख यांना अडकवण्यासाठी आपल्याला खोटी तक्रार दाखल करायला लावली, असा दावा या पीडितेने केला. त्यासाठी धस यांच्या ओळखीतल्या नदमोद्दीन शेख याने मला लग्नाचे अमिष दाखवून माझ्यावर अत्याचार केला. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. आणि ती व्हायरल करायची धमकी देऊन मला मेहबूब शेख यांच्यावर खोटे आरोप करायला लावले, अशी तक्रार या पीडितेने दिली आहे. त्यानंतर चित्र वाघ यांनी या पीडितेन घुमजाव केल्याचे सांगत आपण कोणत्याही चौकशीला समोरे जायला तयार आहे असे सांगितले होते. मात्र आता राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख यांनी आक्रमक होत चित्रा वाघ यांना थेट नार्को टेस्टचं आव्हान दिलं आहे.
या प्रकरणात अनेक गंभीर गोष्टी आहे. त्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. तिला जीवे मारायचं आणि तो आरोप महेबूब शेख वर करायचा आणि त्याला अटक करायची हा कट होता, असा आरोप आता शेख यांनी केला आहे. मी पहिल्या दिवस पासून सांगत आहे माझी नार्को टेस्ट करा हे सर्व खोटं आहे. उपरवाले के घर मे देर है अंधेर नही. शेवटी सत्याचा विजय झाला. चित्रा वाघ आणि सुरेश धस यांनी मला गोवण्यासाठी किती कट केले यात दिसून आलं. माझं राजकीय जीवन व संपूर्ण आयुष्यातून उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न होता. अशा गोष्टीचे मार्गदर्शन चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्यासारखे व्यक्ती करत आहेत. याचं नवल वाटते, असेही मेहबूब शेख म्हणाले आहेत.
या लोकांसोबत कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे मी काम केलं हे लोक इतक्या नीच पातळीला जातील असं वाटलं नव्हतं. आपला सहकारी पक्ष बदलत नाही म्हणून एवढ्या नीच पातळीवर जाऊन त्याला बदनाम करायचं. तसेच चित्रा वाघ मुलींवर दबाव टाकून खोटं बोलून घेतात, हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्कोटेस्टला समोर यावं मी नार्कोटेस्टला तयार आहे, असे आव्हानच आता शेख यांनी देऊन टाकलं आहे. तसेच नवऱ्याच्या लाचखोरीवर चित्रा वाघ कधी बोलत नाहीत, त्याला कधी नितीमत्ता शिकवत नाही. मुलगी खरं बोलायला लागते तेव्हा चित्रा वाघ यांचा दबाव असतो. मी कायदेशीर मार्गाने पुढची लढाई लढणार आहे. तसेच पोलिसांनी चित्रा वाघ यांची कसून चौकशी करावी, मुलीला कसं कोंडून ठेवलं हे तिने तक्रार मध्ये म्हटलं आहे, असे अनेक आरोप आज शेख यांनी केले आहेत.