अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. बळवंत वानखेडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. त्यामुळे ते अमरावतीचे खासदार झाले. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, आमदार असताना खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन पैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागत. त्यामुळे बळवंत वानखेडे यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बळवंत वानखडे विजयी झाले होते. पण आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात प्रचार केला. तसेच बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदावाराला उभं केलं. त्यामुळे त्याचा थेट फटका हा नवनीत राणा यांना बसला. तर काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना सर्वाधिक मतं मिळाली. त्यामुळे ते विजयी झाले.
बळवंत वानखेडे यांनी खासदारकी जिंकताच ते आता कामाला देखील लागले आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आता दिल्लीला देखील जाणार आहेत. दिल्लीत संसदेत येत्या 24 जून पासून अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनासाठी बळवंत वानखेडे हे दिल्लीला जाणार आहेत. वळवंत वानखेडे यांचा प्रवास हा ग्रामपंचायात सदस्यपासून सुरु झाला होता. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सभापती, जिल्हा बँक सदस्य, आमदार आणि आता खासदार असा बळवंत वानखडे यांचा प्रवास राहिलेला आहे.