अमरावती : जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी (Ghatladki) येथील 12 वर्षाच्या मुलीचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे. या मुलीवर अमरावतीच्या कोविड रुग्णालयात (covid Hospital) उपचार सुरु होते. 25 एप्रिल रोजी या मुलीला कोविड हॉस्पिटलला उपचारासाठी भरती करण्यात आले होते. या मुलीला अन्य आजारही होते. त्यात तिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर तिच्यावर कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. 19 मार्चनंतर कोरोनामुळे हा पहिला मृत्यू जिल्ह्यात झालेला आहे. सध्या कोरोनाची स्थिती पाहता जिल्ह्यात कोणताच रुग्ण हा कोरोना पॉझिटीव्ह नाही. मात्र या मुलीला कोरोनाची लागण कुठून आणि कशी झाली याचा तपास आरोग्य यंत्रणा (Health System) करीत आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवने यांनी दिली.
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 3,377 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 17,801 इतका झाला आहे. कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण 98.74 टक्के इतकं आहे. तर गेल्या 24 तासांत देशात 2,496 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनानं या मुलीचा मृत्यू झाला. पण, जिल्ह्यात दुसरा कोणताही व्यक्ती हा सध्यातरी पॉझिटीव्ह नाही. त्यामुळं तीच कशी काय पॉझिटीव्ह आली. याचा शोध आता आरोग्य यंत्रणा घेत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. गेल्या दोन महिन्यांपासून अमरावतीत एकही कोरोनाचा मृत्यू झाला नाही. या मुलीला कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यामुळं तिच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते.