अमरावती : ठाकरे गटाची शिवसेना ही राष्ट्रवादीची शिवसेना असल्याचं जयंत पाटील यांनी गमतीनं म्हटलं होतं. त्यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी लोकांकरिता विशेषतः मुंबईकरिता काढलेली संघटना आहे. ती नंतर सर्वदूरपर्यंत महाराष्ट्रात पोहचली. त्यांची धोरणं, विचार बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वदूर पोहचविले. ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी वय झाल्यामुळं या संघटनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं देतोय. तसंच युवा नेतृत्व आदित्य ठाकरे करतील, असं शिवाजी पार्कवर सांगितलं होतं.
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा काही वेगळा अर्थ काढू नका. त्यांचा तसा अजिबात म्हणण्याचा हेतू नसेल. कारण माझी, त्यांची भेट नाही. परंतु, त्यांना याबद्दल काय वाटतं. ते आणि आम्ही बघू, असंही अजित पवार म्हणाले.
महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. महापुरुषांबद्दल अपमानास्पद शब्द वापरतात. बेताल वक्तव्य करतात. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे अग्रेसीव भूमिका राज्य सरकार घेताना दिसत नाही. ठराव होताना दिसत नाही, असा आरोपही अजित पवार यांनी केला.
मागासलेल्या भागाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना आपण महत्त्व देऊ. हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. तालुका, जिल्हा, राज्य यांचा सीमावाद असेल, तर चर्चेतून तो वाद मिटू शकतो. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयात आपण आपली बाजू मांडली पाहिजे. ते त्यांची बाजू मांडतील. उत्तमातले उत्तम वकील दिले पाहिजे. व्यवस्थेला कन्व्हींस करायला यशस्वी झालो पाहिजे. म्हणजे मराठी भाषिक तिकडे राहिलेला भाग इंच न इंच आपल्या राज्यात येईल, असंही अजित पवार यांनी सांगितलं.