अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप केला. पोलीस (Police) अधिकाऱ्याने आपला फोन रेकॉर्ड केल्याचाही आरोप केला. अमरावतीच्या राजापेठ पोलीस (Amravati Police) स्टेशनमध्ये पोलिसांशी चार दिवसांपूर्वी हुज्जत घातली. आता खासदार नवनीत राणांनी पोलिसांचा अपमान केला. त्यामुळे खासदार नवनीत राणांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमरावतीमधील पोलीस पत्नी व शिवसेना पदाधिकारी वर्षा भोयर (Varsha Bhoyer) यांनी पोलिसांकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलीस बॉईज संघटनेने राजापेठ पोलिसांना निवेदन दिले होते.
अद्यापही खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळं पोलीस पत्नी वर्षा भोयर या संतप्त झाल्या आहेत. आज नवनीत राणा यांच्या विरोधात हातात पोस्टर घेऊन त्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांचा खरपूस समाचार घेतला.
सरकारी कामात अडथळा आणला तर सर्वसामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. मग खासदार नवनीत राणांवर गुन्हा दाखल का नाही.पुढील दोन दिवसात खासदार नवनीत राणांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा राजापेठ पोलीस स्टेशनसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला.
नवनीत राणांविरोधात मी आवाज उठवला. त्यामुळे महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र बाहेरून पोलिसांचे मला फोन येत आहेत. मला खूप लोकांचं समर्थन मिळत आहे, असे यावेळी माध्यमांशी बोलताना वर्षा भोयर म्हणाल्या. आतापर्यंत मी संयम बाळगला. माझ्या घरातील तिसरी पिढी ही पोलिसात काम करते. पोलिसांचं दुःख काय हे मला माहीत आहे. त्यामुळे मी खासदार नवनीत राणांविरोधात आवाज उठवला असं भोयर यांनी स्पष्ट केलं.
नवनीत राणा यांनी केलेला राडा पहिला नाही. यापूर्वी नवनीत राणांनी राडा केला आहे, असेही वर्षा भोयर म्हणाल्या. पोलीस तुमचे नोकर आहेत का, असा सवालही खासदार नवनीत राणा विरोधात त्यांनी उपस्थित केला. तुम्ही पोलिसांची सुरक्षा घेऊ नका, असेही त्यांनी म्हटलं. दरम्यान, जोपर्यंत खासदार नवनीत राणा माफी मागणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं वर्षा भोयर यांनी ठणकावून सांगितलं.