अमरावती : अमरावतीच्या अचलपूरमध्ये दंगलीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झालं आहे. भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Former Agriculture Minister Anil Bonde) यांनी या दंगलीमागे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा हात असल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेसने देखील प्रतिउत्तर दिलं. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे (Congress MLA Balwant Wankhade) यांनी थेट बोंडे यांना पिसाळलेला कुत्रा आणून द्या आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा, असे थेट आव्हानचं केलं आहे. त्यामुळं अनिल बोंडे यांची चांगलीच गोची झाली आहे. अचलपूर दगडफेक प्रकरणावरून अनिल बोंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. एकीकडं यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांचा खरपूस समाचार घेतला. दुसरीकडं
अचलपूर दगडफेक प्रकरणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर चौफेर हल्ले चढविले जात आहेत. विशेषतः माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. अनिल बोंडे हे दंगली पसरवितात, असा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारीही पुढं आले. या सर्वांनी अनिल बोंडे यांच्यावर चौफेर हल्ला चढविला आहे.
अमरावती जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमरावतीतील सुजाण नवतरुणांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे, असे आवाहन तिवसा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आकांक्षा ठाकूर यांनी केले आहे. भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवण्याचे काम करू नये. आम्हाला येथे शांतता आणि प्रगती हवी आहे. आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे. भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढलेला बघायचे आहे. आम्हाला शांततेत जगू द्या आणि अमरावतीच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लागू द्या असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.