अमरावती : पत्नीची हत्या करून आरोपी 28 वर्षांपूर्वी फरार झाला. आपण आता पोलीस अटकेपासून वाचलो असे समजत असताना पोलिसांनी मात्र त्याचा पत्ता काढून त्याला अटक केली. फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याची सध्या अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेत अमरावती ग्रामीणच्या ब्राह्मणवाडा येथील ठाणेदार पंकज दाभाडे यांनी आरोपी नुरुल्ला खान वजीरउल्ला खान याला तब्बल 28 वर्षांनंतर अटक केली. ब्राह्मणवाडा थडी येथील आरोपी नुरुल्ला खान याने पत्नीची हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला होता. तो अमरावती येथे भीक मागून आपले जीवन जगत होता. तो ट्रान्सपोर्ट नगर येथे राहत असल्याची माहिती ठाणेदार पंकज दाभाडे यांना मिळाली. त्यांनी पथक पाठवून आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीने गुन्हा कबुल केला.
अमरावती येथे नुकत्याच झालेल्या इजतेमांमध्ये नुरूल्ला खान भीक मागताना दिसल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी शोध घेऊन रस्त्याच्या कडेला झोपेत असलेल्या नुरुला खान याला शेवटी तब्बल 28 वर्षानंतर अटक केली. हा आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी भीक मागत होता. एका चुकीमुळे आयुष्याची २८ वर्षे त्याने भीक मागून दिवस काढले. अखेर पोलिसांच्या तावडीत तो सापडला. गुन्हा केल्यानंतर पश्चाताप केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. शेवटी जेलची हवा खावी लागणार आहे.
पंकज दाभाडे म्हणाले, अमरावतीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगडे यांनी फरार आरोपी शोधून काढण्यासाठी आदेश दिले. ब्राह्मणवाडा थडी पोलीस हद्दीतील आरोपीने चांदूरबाजार हद्दीत गुन्हा करून पसार झाला होता. पत्नीचा खून करून तो फरार झाला होता. गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती येथून आरोपीला अटक करण्यात आली. १८ वर्षांपासून फरार असलेला हरिश्चंद्र पावसकर याला अटक करण्यात आली. त्याला शेजशिवारातून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.