अमरावती : शहरात झालेल्या हिंसाचारात एकाचवेळी मोर्चे कसे निघाले? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील घटना सुनियोजित कट आहे. त्यामुळं या हिंसेची चौकशी करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. अमरावतीत पत्रकार परिषदेत ते आज दुपारी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, १२ नोव्हेंबरची घटना डिलीट करून १३ नोव्हेंबरच्या घटनेला जे जबाबदार नाही. पण, ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधितांना टार्गेट केलं जातं हा आमचा आरोप आहे. आम्ही पोलिसांसोबत बैठक घेतली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. आम्हाला शांतता हवी. दंग्यांनी काही होत नाही, असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करत असेल तर आम्हाला निषेध करावा लागेल, विरोध करावा लागेल. नाहीतर जेलभरो आंदोलन करू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. खोट्या गुन्ह्यात टाकायचे असेल तर आम्हीच तुरुंगात येतो. एकतर्फी कारवाई बंद करा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. शिवाय, आम्ही गृहमंत्र्यांना या हिंसाचार प्रकरणाची माहिती देणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.
जी घटना घडली नाही त्यावर मोर्चा काढणं, चुकीचं आहे. चुकीच्या माहितीवर आधारीत मोर्चा काढला गेला. कुराण शरीफ जाळतात असं दाखवण्यात आलं. तो दिल्लीच्या कॅम्पमधील व्हिडिओ होता. पाकिस्तानातील फोटो होते, असंही फडणवीस यांनी सांगितलं. एवढे मोठे मोर्चे राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात, हे आता ठरवलं आणि निघाले असं नाही, हे नियोजित मोर्चे आहेत. एकाच वेळी एकाच दिवशी निघालेत. फेक न्यूजच्या आधारे मोर्चे कोणी काढले त्याची चौकशी करा. त्यांची या मागची भूमिका काय होती, हे यातून बाहेर येईल, असंही फडणवीस म्हणाले.
आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा
देवेंद्र फडणवीसांचा अमरावती दौरा; व्यापाऱ्यांशी चर्चा करून नुकसानाचा घेतला आढावा