अमरावती : हनुमान चालीसानिमित्त राजकारण चांगलंच पेटतंय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मातीश्रीवर हनुमान चालीसाचं पठण करावं असं म्हटलं. यावरून शिवसैनिक आणि राणा समर्थक यांच्यात वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हटलं नाही, तर आम्ही तिथं येऊन हनुमान चालीसा म्हणू असं आव्हानच राणा दाम्पत्यांनी शिवसैनिकांना दिलं. राणा दाम्पत्यांचं आव्हान पाहता शिवसैनिक (Shiv Sainik) एकवटले. मुंबईत मातोश्रीसमोर जमले. राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी केली. यावर नवनीत राणा यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा त्या म्हणाल्या. मी महाराष्ट्रातील मुंबईची मुलगी आहे. विदर्भाची सून आहे. कुणामध्ये हिंमत असेल, तर मला त्यांनी वेळ आणि जागा सांगावी. तिथं येऊन मी हनुमान चालीसा म्हणेन.
अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिरात राणा दाम्पत्यानं आज हनुमान चालीसाचं पठण केलं. हे करत असताना मुंबईत मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. नवनीत राणा यांच्या आव्हानंतर ही गर्दी होती. मुंबईत यावेळी राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा अमरावतीत बोलत होत्या.
मी मुंबईची मुलगी असल्यामुळं तिथलं राजकारण मलाही माहीत आहे. शिवाय आता मी विदर्भाची सून आहे. त्यामुळं हनुमान चालीसा म्हणण्यासाठी काही अडचण नाही. आम्ही या माध्यमातून आमच्या धर्माची संस्कृती जोपासत आहोत. कुणी आव्हान देत असेल, तर जिथं म्हणाल तिथं हनुमान चालीसा म्हणू, असं म्हणून नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना डिवचलं. कारण काल रात्र काही युवा सेनेचे कार्यकर्ते राणा यांच्या निवासस्थानासमोर आले होते. त्यांनी दिवसा यायला हवं होतं, असंही त्या म्हणाल्या. आज अमरावतीत दिवसभर तणाव होता. युवा सेना आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते काल रात्री समोरासमोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता.
अमरावतीत राणा दाम्पत्याकडून हनुमान मंदिरात लावण्यासाठी भोंग्याचं वाटप करण्यात आलं. ज्या मंदिरात हनुमान चालीसा म्हटलं जाणार होतं, अशा मंदिरांसाठी राणा दाम्पत्यानं भोंग्यांचं वाटप केलं. भोंग्यांवरून हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राणा दाम्पत्यानं केलं होतं.