अमरावती हा सध्या राज्यातील सर्वात हायहोल्टेज मतदार संघ ठरला आहे. नवनीत राणा यांना भाजपने तिकीट दिल्यापासून राजकीय सारापाटीवरील गणितं बदलली आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसने शडडू ठोकले आहेत. तरआनंदराज आंबेडकर हे पण नशीब आजमावत आहेत. या सर्व राजकीय धुराळ्यात आता आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत. उद्या या मैदानावर अमित शाह यांची सभा होणार आहे. काय आहे हा वाद?
प्रहारचा काय दावा
प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी अमरावतीमधील मुख्य भागातील सायन्स कोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे. पण त्याच ठिकाणी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीची जय्यत तयारी पण सुरु करण्यात आल्याने प्रहार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दबाबतंत्राचा बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
उद्या अमित शाह यांची सभा
अमरावती येथील सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने सामने आले आहेत. अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. उद्या याच मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि बच्चू कडू यांची सभा होणार असल्याचे समजते. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजपकडून मंडप उभारणीच काम अंतिम टप्प्यात आले आहे. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यास उद्याच्या सभेवर संकट उभे ठाकणार आहेत.
तर जनआंदोलन करणार
रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष स्वतः नवनीत राणा यांनीच फोडल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे. पोलीस आणि प्रशासन मैदाना सोडण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप कडू यांनी केला. निवडणूक शांतेत पार पडावी अशी आमची इच्छा आहे. पण मैदानासाठी पोलीस आणि प्रशासनाने दबाव टाकल्यास, मैदान मिळाले नाही तर जनआंदोलन करणार असल्याचे, उपोषण करण्याचा इशारा कडू यांनी दिला.