राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा रंगला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचे पीक जोमात आहे. राज्यातील बड्या नेत्यांसह केंद्रातील बडे नेते राज्याच्या विविध भागात सभा घेत आहेत. या सभेमुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. आरोपांच्या फैरी सुरू आहेत. दिग्गज नेत्यांच्या फटकेबाजीमुळे सभेत रंगत चढली आहे. तर हश्या पिकला आहे. अमरावतीत महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले. त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. त्याचवेळी डायलॉगबाजीने सभा गाजवली.
अमरावतीत डायलॉगबाजी
काही उमेदवारांना लोक उपरे म्हणतात. बाहेरचे म्हणतात. अरे पण त्यांचं घर इथेच आहे. खासदार, आमदार असलेल्या लोकांना तुम्ही बाहेरचे कसे म्हणताय, असा सवाल त्यांनी विरोधकांनाच नाही बंडखोरांवर टोलवला. यावेळी त्यांनी आपण लाडक्या बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्याचे सांगितले होते. आता लाडक्या बहिणीला आपले सरकार जादा रक्कम देणार असल्याचे ते म्हणाले. ‘एक बार कमिटमेंट कर दी तो मैं खुदकी भी नही सुनता’, असा डायलॉग म्हणताच सभेत एकच खसखस पिकली. महिलांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना चांगलेच फटकारले. एकीकडे लाडक्या बहीणविरोधात कोर्टात जायचे आणि दुसरीकडे सत्ता आल्यावर या योजनेची चौकशी करायची. ज्यांनी योजना सुरू केली, त्यांची चौकशी करणार आहेत. त्यांना महाविकास आघाडी तुरुंगात टाकणार आहे. पण माझ्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे एकदा नाही तर अनेकदा तुरूंगात जायला तयार असल्याचे ते म्हणाले.
पाणंद मुक्त रस्त्यासाठी मोठा निर्णय
गावा गावात पाणंद रस्त्याची मोठी समस्या आहे. शेतात जायला आणि इतर गावात जायला धड रस्तेच नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकं याच मुद्दाला अमरावतीच्या सभेत हात घातला. पाणंद मुक्त रस्त्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील 45 हजार गावात जे रस्ते पाणंद मुक्त झाले आहेत, ते बांधण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी या सभेत जाहीर केले. शहराप्रमाणेच गावात चांगले रस्ते तयार करणार असल्याचे ते म्हणाले. तर अंगणवाडी सेविकांना पण मोठं मानधन त्यांनी जाहीर केलं.