नागपूर : संजय राऊत यांनी आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांना नागपूर येथील पत्रकार परिषदेत 20 फूट खड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा वापरली होती. संजय राऊत यांच्यावर 153(A),294,506 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, अशी मागणी युवा स्वाभिमानच्या वतीनं नागपूर पोलीस आयुक्त (Commissioner of Police) अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांना निवेदनातून व लेखी तक्रारीतून केली आहे. तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या आहेत. खासदार नवनीत रवी राणा यांना जातीवाचक शिवीगाळ व जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅक्ट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी तक्रार नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना सोपविली.
नागपुरात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केली आहे. संजय राऊतांच्या वीस फूट खड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याच्या वक्तव्या विरोधात तक्रार केली आहे. संजय राऊत यांच्या विरुद्ध अॅक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ऍड दीप मिश्रा, जितू दुधाने, विनोद गुहे व सचिन भेंडे उपस्थित होते.
संजय राऊत यांनी माझी समाजात बदनामी करण्यासाठी बबली, बंटी म्हटलं. तसंच 420 सुद्धा म्हटलं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील निवासस्थानी चिथावून पाठविले. माझ्यासाठी रुग्णवाहिकासुद्धा आणून ठेवली होती. एका मागासवर्गीय महिलेला घराबाहेर पडण्यापासून मज्जाव केला. शिवसेनेतील एका कार्यकर्त्यानं मला चोर, चांभार म्हणून संबोधले. त्यामुळं संजय राऊत व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात जाती व जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पेनड्राईव्हमध्ये संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या मुलाखतीचा पुरावा दिला आहे.