अमरावती : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आलीय. भाजप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भिडणाऱ्या अमरावतीमधील (Amravati) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाघिण आणि फायरब्रँड नेत्या वर्षा भोयर (Varsha Bhoyar) नाराज असल्याची माहिती समोर आलीय. वर्षा भोयर नाराज असल्याने आतून खचल्या आहेत. त्यामुळे त्या उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे वर्षा भोयर यांनी आपल्या नाराजी विषयी माहिती सांगणारा एक व्हिडीओ देखील जारी केलाय. याशिवाय त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर आपली नाराजी स्पष्ट करत काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सूचित केलंय. वर्षा भोयर या उद्धव ठाकरे यांच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला तर हा ठाकरे गटासाठी खूप मोठा झटका असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे वर्षा भोयर यांची मनधरणी करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा भोयर या पक्षातील अंतर्गत कुरघोडींमुळे वैतागल्या आहेत. अमरावतीतील ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना अपमानाचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे वर्षा भोयर या भयंकर नाराज झाल्या आहेत. त्यामुळे ते काहीतरी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. वर्षा यांनी जारी केलेल्या व्हिडीओत याबाबत सविस्तर स्पष्ट केलंय.
“जय महाराष्ट्र! मी वर्षा भोयर. शिवसेनेची अमरावती जिल्हा संघटक. मी नाराज झालीय पण उद्धव ठाकरे यांच्यावर नाही. उद्धव ठाकरे खूप साधे आहेत. ते प्रत्येकाला आपलसं समजतात. पण आमच्याच पक्षातील काही मंडळी आहेत. ज्यांना असं वाटतंय की, वर्षा भोयर काहीच कामाची नाही. हरकत नाही. माझी कोणावरही नाराजी नाहीय”, असं वर्षा भोयर म्हणाल्या आहेत.
“फक्त वाईट वाटतंय की, सतरा-अठरा वर्षांपासून पक्षाने जे आदेश दिले ते प्राणपणाने पाळले. रात्रभर कस्टडीमध्ये राहण्याची वेळ आली. आनंदाने राहिली. कुठली तक्रार केली नाही. कित्येक साऱ्या केसेस लागल्या. वरिष्ठांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन केलं. जेव्हा अमरावतीच्या नवनीत राणा अख्या भारतात उद्धव ठाकरेंवर बोट उचलला तेव्हा त्यांचं बोट पकडण्याची हिंमत मी केली. माझ्या वरिष्ठ नेत्यांना वाटत असेल की, मी काही कामाची नाहीय. तर मी थांबायला तयार आहे”, अशा इशारा वर्षा भोयर यांनी दिलाय.
वर्षा भोयर यांनी फेसबुकवरही पोस्ट केलीय. काही “आपले आपल्याला इतके हतबल करुन टाकतात की शेवटी पर्याय नसतो चुकीचा निर्णय घेतल्याशिवाय. जय महाराष्ट्र”, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केलीय.