अमरावती : शहरामधील गरिबीतून पुढे आलेले प्रसिध्द उद्योजक (Entrepreneur) व दानशूर समाजसेवी अशी नितीन कदम यांची ओळख आहे. नितीन कदम (Nitin Kadam) हे संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत. नितीन कदम यांच्या पुढाकारातून आज बेरोजगार युवकांना रोजगारासाठीचा (Employment) कार्यक्रम घेण्यात आला. चारचाकी हातगाडी, व्यवसायासाठी भांडवल व अत्यावश्यक साहित्य वाटप बेरोजगारांना करण्यात आले. संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयासमोर अगदी साधेपणाने हा सोहळा पार पडला.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला आमंत्रण देण्यात आले नव्हते. केवळ बेरोजगार आणि नितीन कदम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
बेरोजगार गरजू युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने दोनशे चारचाकी हातगाडींसह त्या गाडीवर माल भरून वाटप करण्यात आले. सर्व गाड्यांची पूजा केल्यानंतर सर्व बेरोजगार युवकांना या गाड्या त्यांच्या सुपूर्त करण्यात आल्या.
नितीन कदम म्हणाले, लॉकडाऊनमध्ये बरेचसे लोकं बेघर झाले. बेरोजगार झाले. त्यांना रोजगार नाही. त्यामुळं एनजीओच्या मार्फत गरिबांना रोजगाराची साधन उपलब्ध करून दिले. गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावी, हा त्यामागचा उद्देश होता.
आमच्याकडे आणखी फार्म येत आहेत. असे बेरोजगार बरेच लोकं आहेत. त्यांनाही आम्ही रोजगार देऊ.सध्या दोनशे लोकांना मदत केली. माझ्या क्षमतेनुसार जेवढं शक्य होईल, तेवढी मदत करतो, असंही कदम यांनी सांगितलं.