अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. रणजित पाटील (Ranjit Patil) यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसकडून धीरज लिंगाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रणजित पाटील हे गेली दोन टर्म निवडून आले आहेत. पाच जिल्ह्यातील या मतदारसंघात १ लाख ८५ हजार ९८५ नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी प्रशासनानं जाहीर केली. आज अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी अमरावतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार आणि आमदार रणजीत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
१२ वर्षात आमदार रणजीत पाटील यांनी काहीच काम केलेलं नाही. सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी कुठलेही ठोस कार्य केले नाही. आजही युवकांना रोजगार निमित्त पुन्हा पुणे, मुंबईमध्ये जावं लागतं, असा आरोप त्यांनी केला.
तसेच २००५ नंतर लागलेले शिक्षक त्यांचा जुना पेन्शनचा मुद्दा निकाली निघाला नाही. त्यामुळे हे सर्व मुद्दे घेऊन मी या निवडणुकीत पदवीधरासमोर मांडणार आणि ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी दिली.
काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या बॅनरवरून ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो गायब झालेत. महाविकास आघाडी मध्येही उमेदवारीवरून धुसपूस असल्याची चर्चा आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी शर्ट काढून चक्क बनियानवर येऊन अर्ज दाखल केला. त्यांना अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी रोखले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी परवानगी दिली व त्यांचा अर्ज स्वीकारला.
कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान द्यावे. पटसंख्येचे निकष लावून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये. शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. पदवीधर बेरोजगार यांना न्याय मिळावा. यासाठी आपली उमेदवारी असल्याचे उमेदवार पाटील यांनी सांगितले. या उमेदवाराची विभागीय आयुक्त परिसरात चांगलीच चर्चा झाली. निवडून आल्यास मागण्या मान्य होईतोवर अंगात शर्ट घालणार नाही, असल्याचही ते म्हणाले.