स्वप्निल उमप, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : महाराष्ट्रातील एक आधुनिक संत. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांची आज 54 वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने देशभरातील लाखो गुरुदेव भक्त हे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोझरी गुरुकुंजमध्ये दाखल झाले आहेत. आज दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज तुकडोजी महाराजांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकुया. जाणून घेऊया कोण होते तुकडोजी महाराज.
1909 मध्ये अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथे तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. शेतकऱ्यांना अर्पण केलेल्या ग्रामगीतेतून त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली.
स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. तुकडोजी महाराज त्यांच्या कार्यामुळं राष्ट्रसंत बनले. त्यांनी १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी 50 ग्रंथांची निर्मिती केली.
यावली शहीद येथे 30 एप्रिल 1909 रोजी तुकडोजी महाराजांचा झोपडीच्या घरात जन्म झाला. घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा होते. लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. शिक्षण तिसरीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडली.
वरखेडला आजोबाकडं असताना आडकुजी महाराजांना त्यांनी गुरू केले. गुरू महाराजांनी त्यांना तुकड्या म्हणून हाक मारली. म्हणून तुकड्या म्हणे या वाक्याचे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जातात.
1930 साली महाराजांनी व्यक्तिगत सत्याग्रह केला. भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. तुकडोजी महाराज नागपूर व रायपूर येथील कारागृहात कैदी म्हणून होते. 1936 मध्ये महात्मा गांधीजींच्या सहवासात अनेक राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला.
तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाची स्थापना केली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने सन्मानित केले.
विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी 1955 मध्ये तुकडोजी महाराज जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान अत्यंत मोहित झाले होते. गुरुकुंज मोझरी येथे तुकडोची महाराजांचा आश्रम आहे. येथे लाखो अनुयायी येत असतात.