पुणे : प्राचीन वाडे आणि गढ्यांचे संवर्धन व्हावे यासाठी नेहमीच मागणी केली जाते. मात्र, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी त्याकडे फारसे गांभीर्याने घेत नाही असे अनेकदा समोर आले आहे. राज्यातील ऐतिहासिक गड किल्ले, वाडे आणि गढयांचे संवर्धन व्हावे यासाठी आता पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यामध्ये ग्रामीण पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील गावागावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सर्व गट विकास अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. खरंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने सविस्तर आदेश काढले आहे. त्यानुसार वाडे सर्वेक्षण मोहीम सुरू झाली आहे.
राज्यातील बहुतांश ठिकाणी वाडा संस्कृती आहे. काही ठिकाणी गढयां देखील आजही आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी हा वारसा अडगळीत पडल्याने अवस्था बिकट झाली आहे.
पुणे जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात वाडा संस्कृती आहे. महाराष्ट्राला लाभलेला हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहरीकरण जसे-जसे वाढत चालले आहे. तसे-तसे वाडा संस्कृती कालबाह्य होत चालली आहे. अनेक जून वाडेही जमीनदोस्त होऊन त्यावर इमारती उभ्या राहत आहे.
हीच संस्कृती जपण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना त्यामध्ये फारसे यश येत नाही, यासाठी शासनाची मदत महत्वाची असते त्यासाठी आता पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्राची वाडा संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन निधी खर्च करणार आहे. त्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातूनही चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
नव्याने हॉटेल्स उभे करण्याऐवजी जुन्या वाड्यांमध्ये पर्यटनासाठी आलेले नागरिक राहिले तरी मोठी उलाढाल होईल अशी अपेक्षा शासनाला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद नियोजन करीत असून वाडा संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करीत आहे.