मुंबई | मराठी नववर्षाचे वेध अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra) लागले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी घरा-घरात केली जातेय. राज्यातील केशरी शिधापत्रिका धारक नागरिकांनाही पाडव्याचा आनंद साजरा करता यावा, यासाठी शिंदे सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा योजना घोषित करण्यात आली होती. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयात चार महत्त्वाच्या वस्तू केशरी आणि पिवळी शिधा पत्रिका धारकांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) केली होती. मात्र गुढीपाडवा उद्यावर येऊन ठेपला तरीही राज्यातील बहुतांश रेशनच्या दुकानांवर आनंदाचा शिधा मिळत नाहीये. त्यामुळे रेशनच्या दुकानांवर पोहोचलेल्या नागरिकांची निराशा होतेय. असंख्य नागरिक रिकाम्या हाताने घरी पोहोचत आहेत. विरोधकांनी यावरून शिंदे सरकरावर जोरदार टीका सुरु केली आहे.
राज्यातील १८ लाखांहून अधिक शासकीय तसेच निम शासकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून बेमुदत आंदोलन सुरु केलं होतं. काल हे आंदोलन स्थगित झालं. आजपासून सर्व कर्मचारी रूजू झाले आहेत. मात्र मागील आठवड्यात सर्व यंत्रणा ठप्प झाल्याने बहुतांश आनंदाचा शिधा रेशनच्या दुकानांपर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये. तरीही उद्यापर्यंत सर्व दुकानांवर आनंदाचा शिधा पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल, असे राज्यशासनाच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
पुणे- पुणे जिल्ह्यात अद्याप आनंदाचा शिधा पोहचला नाही. आनंदाचा शिधा अद्याप गोडाऊनमध्येच पडून आहे. उद्याच्या गुढी पाडव्यासाठी आज संध्याकाळपर्यंत शिधा राशन दुकानांपर्यंत पोहचण्याची शक्यता, अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
धुळे- धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे फक्त एकच गाडी भरून आनंदाचा शिधा पोहोचला असून हा आनंदाचा शिधा रेशन दुकानदारांपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. जिल्ह्यात दोन ते अडीच लाखाहून अधिक लाभार्थी असून त्यांच्यापर्यंत आनंदाचा शिधा लवकरात लवकर पोहोचवण्याचा आवाहन प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
भंडारा- शहरी व ग्रामीण भागात आनंदाच्या शिधा न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.दिवाळीतील आनंदाचा शिधा दिवाळीनंतर मिळाला होता. आताही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
चंद्रपूर- आठ दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप व वाहतूक व्यवस्थेतील अडचणी यामुळे आनंदाचा शिधा पोहोचण्यात विघ्न आले आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत आनंदाचा शिधा विविध रेशन दुकानात पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर- नागपूरात आनंदाचा शिधा पोहोचायला आणखी आठ दिवस लागणार आहेत. या महिन्याचं धान्य वितरीत झालंय, त्यामुळे काही दुकानातून पुढच्या महिन्यात हा आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार, सरकारने आधीच शिधा वितरण सुरु करायला हवं होतं, असं मत प्रदेश काँग्रेस रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी व्यक्त केलंय.
नाशिक- नाशिकमध्येही आनंदाचा शिधा पोहोचला नसल्याचं वृत्त आहे.
परभणी– परभणीतदेखील आनंदाचा शिधा पोहोचला नाहीये. त्यामुळे नागरिकांनी निराशा झाली आहे.
राज्यात आनंदाचा शिधा योजना सरकारने जाहीर केली, मात्र संपामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अचानक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला कोंडीत पकडलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीचाच शिधा पोहोचला नाही, आता हा कसा मिळणार, असा सवाल केला जातोय. संजय राऊत, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेत्यांनी शिंदे सरकारवर यावरून जोरदार निशाणा साधलाय. त्यामुळे लवकराच लवकर या योजनेची अंमलबजावणी करणे हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे.