अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील गुहा गावात प्रशासनाने कानिफनाथ मंदिरात (kaniphnath temple) अचानक जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्याचबरोबर त्यामुळे ग्रामंस्थामध्ये संतापाची लाट उसळली होती. आज गुहामध्ये संतापलेल्या ग्रामस्थांनी राहुरी तहसिल कार्यालयावर (rahuri tahsil) भव्य मोर्चा काढत दोन तास ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात महिलांचा अधिक सहभाग होता. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तहसील कार्यालय मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर जनभावनेचा आदर करत प्रशासनाने जमावबंदीचा आदेश मागे घेतला आहे. तसेच आरती, दर्शन आणि धार्मिक परंपरा साजऱ्या करण्यासाठी ग्रामस्थांना परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
राहुरी तालुक्यातील गुहा गावात शेकडो वर्षांपासून कानिफनाथ महारांजाच्या मंदिरात भाविक गुरूवारी आरती करत असतात. काल मात्र प्रशासनाने अचानक जमावबंदीचा आदेश लागू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कानिफनाथ मंदिर आणि मस्जीद अशी न्यायालयीन लढाई सुरू असताना अचानक जमावबंदीचे आदेश दिल्याने प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.
कानिफनाथ मंदिराच्या नावे असलेली चाळीस एकर जमिन कोणालाही कल्पना न देता परस्पर वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि कागदोपत्री कानिफनाथ मंदिर नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असा उल्लेख करण्यात आल्याने न्यायालयीन लढा सुरू झाला आहे. न्यायालयाचा कोणताही निकाल नसताना कानिफनाथ मंदिरात हिंदू बांधवांना प्रशासनाने काल आरती करण्यापासून रोखल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.
मागच्या काही दिवसांपासून अशी परिस्थिती तिथं निर्माण होईल, अशी कल्पना सुध्दा पोलिसांनी केली नव्हती. अचानक ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना तिथं पाचारण करण्यात आलं होतं. त्याचबरोबर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्यामुळे तिथं अधिक पोलिस मागवण्यात आले होते. पण तहसिल कार्यालयाने चांगला निर्णय घेतला आणि तात्पुरता वाद सपुष्टात आला.