72 तासाचं ऑपरेशन, 5 विशेष पोलिस पथकं, अनिल जयसिंघानीला कशी अटक झाली, पोलिसांनी काय सांगितलं?

| Updated on: Mar 20, 2023 | 2:26 PM

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात पोलीस, सायबर पथकाच्या मदतीने मुंबई पोलिसांनी तब्बल 72 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर त्याला अटक केली.

72 तासाचं ऑपरेशन, 5 विशेष पोलिस पथकं, अनिल जयसिंघानीला कशी अटक झाली, पोलिसांनी काय सांगितलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील फरार आरोपी अनिल जयसिंघानी यांना अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अनेक वर्षांपासून फरार असलेला अनिल जयसिंघानी हा आपलं लोकशन लपवण्यात आणि पोलिसांना गुंगारा देण्यात अत्यंत पटाइत होता. मात्र सायबर शाखेच्या पोलिसांची विशेष पथकं तसेच गुजरात पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी अखेर अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली. गुजरातमध्ये दोन ठिकाणी सापळा रचण्यात आला. दोन्ही ठिकाणांहून तो निसटला. मात्र तिसऱ्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली. तब्बल 72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अनिल जयसिंघानी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यासोबत अन्य दोघांनाही चौकशीकरीता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कशी केली अटक?

  • मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच वर्षांपासून फरार असणारा आरोपी अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात येत होते.
  • आरोपी हा इंटरनेट, मोबाइलचा वापर करून आपले अस्वित्व बऱ्याच वर्षांपासून लपवत होता. आतापरत्यंत 15 गुन्हे दाखल आहेत. बऱ्याच गुन्ह्यात तो फरार आहे. हा आरोपी तांत्रिक बाबींची मदत घेऊन स्वतःचं अस्तित्व लपवत होता. गुन्हे शाखेने एकूण 5 पथके निर्माण केली होती. सायबर गुन्ह्यांची तीन पथक होती. विविध पथकं वेगवेगळ्या राज्यात अभियान राबवत होती.
  • महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरात राज्यातील बार्दोली येथे रवाना झाल्याचे निदर्शनास आले. तीन पथक गुजरातेत पाठवण्यात आले. वरील पथकांनी सूरत पोलीस, ग्रामीण पोलीस, गोध्रा, भरोच, वडोदरा पोलीस समन्वय करून हे ऑपरेशन फत्ते केले.
  • अनिल जयसिंघानी 72 तास पोलिसांना गुजरातमध्ये चकवा देत होता. बार्दोली येथे पोलिसांनी सापळा रचला होता. तेथून तो निसटला. त्यानंतर सूरतला तो गेला. तेथूनही पळाला. कोटदरा, भरोच, वडोदरा यामार्गे तो गोध्रा याठिकाणी पळून जात असताना 72 तासांच्या पाठलागानंतर रात्री पावणे बाराच्या सुमारास नाकाबंदी करून कलोल गोध्रा जवळील ठिकाणी गुजरात पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले आहे.
  • आरोपीकडून मोबाइल, वापरलेली इतर इंटरनेटची साधने, एक कार जप्त करण्यात आली आहेत. इतर मदत करणाऱ्या लोकांना चौकशीकरिता ताब्यात घेतलं आहे. जी कार वापरली ती महाराष्ट्रातील आहे. ह्युंदाई कंपनीची कार आहे.
  • मुंबई पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना अनिल जयसिंघानी याला मलबार हिल पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. त्याच्यासोबत ड्रायव्हर आणि एक नातेवाईक अशा दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांनाही मलबार हिल पोलिस स्टेशनला सुपूर्द करण्यात आलंय.

एवढे दिवस अटक का नाही?

देवेंद्र फडवणवीस तसेच अमृता फडणवीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर एवढे दिवस फरार असलेला आरोपी अनिल जयसिंघानी याला वेगाने सापळा रचून अटक करण्यात आली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. एवढ्या वर्षांपासूनचा फरार आरोपी फडणवीस यांनी तक्रार केल्यानंतर आताच कसा अटक झाला, हाय प्रोफाइल लोकांच्या तक्रारीनंतरच पोलीस कामाला लागतात का, असा सवाल करण्यात येतोय. पोलिसांनाही सदर पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारण्यात आला. मात्र पोलिसांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.