शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. शिवसेना वाढविण्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे योगदान काय असा थेट सवाल त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख असायचे तेव्हा नेत्यांची मिटिंग व्हायची. नेत्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे. पण, हा माणूस एकटाच सगळं बघतो. शिवसैनिक आमचे गुलाम आहेत. शिवसेना यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे यांना वाटते, अशी जळमळीत टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तर, अजितदादा थोडे दिवस आमच्यासोबत नसते आले तरी चालले असते असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केली.
अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाच्या काही आमदारांना मंत्री पदापासून दुर रहावे लागले. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. नेमकी तीच बाब रामदास कदम यांनी जाहीर सभेतून व्यक्त केली. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले याबद्दल मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद असे सांगितले.
भाजपने 15 उमेदवार आधी जाहीर केले. त्याचप्रमाणे शिवसेनेनेही आधी उमेदवार दिले असते तर चित्र वेगळे दिसले असते असे सांगून रामदास कदम पुढे म्हणाले, मोदी आणि शाह यांना सांगा की विधानसभेत आपल्याला 100 उमेदवार द्या. 90 निवडून आणले नाही तर बघा. मोदी आणि शिंदे हे मुस्लिमांच्या विरुद्ध नाही. जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा पहिले हेच धावतील असे ते म्हणाले.
छत्रपतींच्या अनेक बाबींची जाणीव उध्दव ठाकरे यांना नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला हरताळ फासला. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेससोबत शरद पवार यांच्यासोबत संघर्ष केला. त्याच कॉंग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले. लाज वाटली पाहिजे काँग्रेसल मतं द्यायला. काँग्रेसने फक्त मतांसाठी त्यांना राबवले. उद्धव ठाकरे तुम्ही झुकलात. आज मोदी यांचे काम जगाने पाहिले त्यांना संपवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी केली.
बाळासाहेबांनी कधी कोणाला जात नाही विचारली. शिवसेनेला 58 वर्ष झाली. त्यात उद्धव ठाकरे आणि पेंग्विन पोराचे काही योगदान नाही. बेडूक अनिल परबने कधी काम केलंय का? कधी फटाके खाल्ले का? हजारो शिवसैनिक जेलमध्ये गेले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. मलाही मारण्याचे प्रयत्न झाले. मला गोळ्या घालण्याचे काम साळसकरने केले. उध्दव ठाकरेच्या सभेत हिरवे झेंडे फडकले. बॉम्बस्फोटाचा आरोपी सभेला आला होता. माझे मंत्रीपद घेऊन पोराला मंत्रीपद दिले. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना नाही. ते नाव घेण्याचा अधिकार शिंदे यांनाच आहे असेही ते म्हणाले.