रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब यांनी यांनी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आणि इशारा एकत्र दिला आहे. विलीकरणाचा निर्णय कोर्टातच होईल, त्याचबरोबर संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई आणखी कडक केली जाईल, असा इशारा परबांनी पुन्हा दिलाय. तर त्यांनी आजच्या निवडणुकांच्या निकालावरही प्रतिक्रिया दिली आहे.
20 तारखेला विलिनीकरणाचा निकाल लागेल
20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल. मात्र आत्ता उगाच एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले जात आहे. दिशाभूल करून संप भरकटत आहे. विलीनीकरणाचा मुद्दा समितीच्या माध्यमातूनच सुटणार आहे, अशी प्रतिक्रिया एसटीच्या संपावर आणि विलीनीकरणावर अनिल परब यांनी दिली आहे. तोपर्यंत कामावर या असे आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा केले आहे.
आतापर्यंत तब्बल 10 हजार कर्मचारी निलंबित
संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच आहे, आतापर्यंत जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त एसटी कर्माचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढची कारवाई ही बडतर्फीची असेल त्यासाठी सरकार एकत्र येऊन निर्णय घेईल, असा इशाराही परबांनी दिला आहे.
पुढच्या वेळी जनता आम्हाला कौल देईल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडूण आलेल्या उमेदवारांवर अवलंबून असतात. भाजपचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद अधिक होती, त्यामुळे त्यांच्या उमेदवारांनी भाजपला निवडून दिल असेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. पुढच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जास्त जागा येतील, असा विश्वासही परबांनी व्यक्त केला आहे.
अकोल्यात कमी मतं पडण्याचे कारण शोधावे लागेल
नागपूरची जागा भाजपची होती तर अकोल्याची जागा शिवसेनेकडे होती, स्थानिक राजकारणामुळे आम्ही ती जागा जिंकत आलो होतो, यावेळी मतं कमी पडण्याचे कारण काय आहे, हे शोधावे लागेल असंही परब म्हणाले आहेत.
सोमय्यांनी आरोप केलेल्या रिसॉर्टशी संबंध नाही
तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर देताना परब म्हणाले, सोमय्या हे मुद्दाम तक्रार करत आहेत. मुरुड मधल्या साई रिसॉर्टशी माझा कुठलाही संबंध नाही. सरकारी यंत्रणेचा रिपोर्ट आला असून देखील वारंवार माझा संबंध या रिसॉर्टशी जोडला जात आहे. माझी बदनामी करण्याचा किरीट सोमय्या यांचा सातत्याने प्रयत्न आहे. या संदर्भात हायकोर्टात मी दावा दाखल केला आहे, एक तर त्यांना माफी मागावी लागेल अन्यथा शंभर कोटी त्यांना मला द्यावे लागतील, असा इशाराही अनिल परबांनी दिला आहे.