वाल्मिकी कराड अखेर शरण आला आहे, त्याने पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्कारली आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याच्यावर आरोप करण्यात येत होते. हत्येच्या घटनेनंतर 22 दिवसांनी वाल्मिकी कराड याने शरणागती पत्कारली आहे. वाल्मिकी कराड शरण आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकारणावर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. दाते पंचांग बघून आज कराडने आत्मसमर्पणे केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या दमानिया?
‘दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरतर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही.’ असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.
दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरातर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते.
पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत… pic.twitter.com/NsXDp0djky
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 31, 2024
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेत जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार, आम्ही कोणालाही सोडणार नाही. हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं आहे. दोषींवर कारवाई होणार, मात्र ज्यांना -ज्यांना यामध्ये राजकारण वाटत असेल त्यांना ते लखलाभ, माझं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी फोनवर बोलणं झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वाल्मिकी कराडवर संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोप करण्यात येत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याने आज पुण्यात शरणागती पत्कारली, तो सीआयडीला शरण आला आहे.