त्या नेत्यांना मोठं करण्यात तुमचाच हातभार, अंजली दमानिया यांची थेट शरद पवार यांच्यावर टीका; असं का म्हणाल्या?

| Updated on: Mar 15, 2025 | 11:31 AM

अंजली दमानिया यांनी खोक्या ऊर्फ सतीश भोसले प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खोक्याच्या घरावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. 13 तारखेला अतिशय चुकीची कारवाई झाली, असं नको व्हायला होतं. प्रत्येकाने कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे. पण तसं होत नाहीये, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

त्या नेत्यांना मोठं करण्यात तुमचाच हातभार, अंजली दमानिया यांची थेट शरद पवार यांच्यावर टीका; असं का म्हणाल्या?
अंजली दमानिया
Image Credit source: X
Follow us on

बीड जिल्हा हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा होता. हा जिल्हा अत्यंत शांत असा होता. आज जो बीड आहे, तसा पूर्वी कधीच नव्हता. बीडची आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, असं विधान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या लोकांमुळे आज बीडची परिस्थिती गंभीर झाली आहे, ते लोक तुमच्याच तालमीत मोठे झाले आहेत, असा पलटवार अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

अंजली दमानिया या मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत. म्हणजे धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, बजरंग सोनावणे असो, हे सगळेच्या सगळे लोक शरद पवार यांच्याच तालमीत वाढलेत. हे सगळे लोक शरद पवारांच्या गटात होते. त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. बीडची स्थिती गंभीर आहे असं शरद पवार म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचाच हातभार आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

तृप्ती देसाई माहिती देणार

यावेळी त्यांनी तृप्ती देसाई यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. तृप्ती देसाई यांना दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून एक नोटीस पाठवण्यात आली होती. काही पोलीस अधिकाऱ्यांची त्यांच्याकडे माहिती आहे. हे लोक वाल्मिक कराडच्या जवळचे होते. त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. त्याचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे. मला वाटतं तृप्ती देसाई सोमवारी जाऊन एसपींना याची संपूर्ण माहिती देणार आहे, असं दमानिया म्हणाल्या.

त्यात तथ्य असतं कधी कधी

आताच माझं तृप्ती देसाईंशी बोलणं झालं आणि त्यांच्याकडे ती पूर्ण माहिती आहे. 26 च्या 26 अधिकाऱ्यांनी पदोपदी कुठे कुठे कोणा कोणाला साथ दिली? कोणाचे गुन्हे पाठीशी घातले? कोणाला मदत केली? कुठल्या कुठल्या आरोपींना मदत केली? ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. त्या 26 तारखेला सोमवारी एसपीए कार्यालयाकडे जाऊन सकाळी 11.30 वाजता माहिती देणार आहेत. आणि सरकारला हे समजून घेणे गरजेचे आहे की, जेव्हा लोकं बोलतात, तेव्हा त्याच्यामागे काहीतरी तथ्य असतं कधी कधी, असंही त्या म्हणाल्या.