हद्द झाली! आता तर कल्याणमध्ये मराठी पोलीस कुटुंबाला परप्रांतीयांकडून बेदम मारहाण

| Updated on: Dec 22, 2024 | 4:16 PM

कल्याणमध्ये तीन दिवसांपूर्वी एका मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा आणखी अशीच एक घटना समोर आली आहे.

हद्द झाली! आता तर कल्याणमध्ये मराठी पोलीस कुटुंबाला परप्रांतीयांकडून बेदम मारहाण
Follow us on

कल्याणच्या एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये तीन दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली होती. विशेष म्हणजे बाहेरून गावगुंड बोलावून मराठी कुटुंबाच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या प्रकरामुळे राज्यभरात खळबळ उडाली, मराठी माणसांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली, न्यायालयानं या प्रकरणातील आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता कल्याणमध्ये पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला पुन्हा एकदा बेदम मारहाण करण्यात आली आहे.  उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्या पत्नीनं देखील मारहाण केली आहे.  मराठी तरुण त्याची पत्नी आणि आईला मराहाण करण्यात आली आहे, या घटनेत हे तिघेही जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, या प्रकरणात मारहाण करणारा व्यक्ती उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात  मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्याला मारहाण करण्यात आली तो तरुण पोलीस कर्मचारी आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला पांडे आणि त्याच्या पत्नीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलीसही सुरक्षित नाहीत? 

तीन दिवसांपूर्वी कल्याणमधीलच एका मराठी कुटुंबावर दोन परप्रांतीय कुटुंबांकडून हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. पोलिसाच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे, त्यामुळे आता पोलीसही सुरक्षित नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.