नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागातील गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच ग्रामीण भागातील दरोडे पडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने ग्रामीण पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. सिन्नर येथील दरोडेखोरांना अटक करून काही तास उलटले नाही तोच दिंडोरी येथील एका शेतकऱ्यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील नागरिक या गुन्हेगारीने भीतीच्या सावटाखाली गेले असून पोलीस काय करत आहे ? असा सवाल उपस्थित करत असतांना नाशिक शहरापासून दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत असलेल्या वणी रस्त्यावर ढकांबे येथे मोठा दरोडा पडला आहे. रतन बोडके यांच्या घरावर हा दरोडा पडला आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान बोडके कुटुंब गाढ झोपेत असतांना शस्रधारी सात ते आठ दरोडेखोरांनी जबरी लूट केली आहे. यावेळी घरात प्रवेश करत असतांना पाळीव कुत्र्याला दरोडेखोरांनी गुंगीचे औषध दिले होते.
घरात प्रवेश केल्यानंतर झोपेतून उठून बसलेल्या मुलीच्या डोक्याला दरोडेखोरांनी बंदूक लावत सोने, पैसे बाहेर काढून द्या अशी धमकी दिली होती .
यावेळी बोडके कुटुंबाने दागिने, रोख रक्कम असा अंदाजे 20 लाखांचा मुद्देमाल देऊन टाकला होता, हा सर्व मुद्देमाल घेऊन दरोडेखोरांनी धूम ठोकली होती.
या दरोडयाच्या घटणेने बोडके कुटुंबासह संपूर्ण जिल्हातच घबराट पसरली आहे. पोलीसांनी दरोडेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
या दरोडयाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली, एकीकडे नाशिक ग्रामीण पोलिसांना नुकतेच नवे पोलीस अधिक्षक मिळाले असून त्यांच्या समोर गुन्हेगारीचे नवे संकट उभे राहिले आहे.
नवे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी पदभार घेताच अवघ्या काही तासांनी सिन्नर येथे दरोडा पडला होता, त्यागुन्ह्याचा छडा लागून काही तास उलटत नाही तोच दिंडोरी येथे आणखी मोठा दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.